दौंड तालुका गुन्हेगारीच्या छायेत?
दंगल, स्फोट, तस्करी, लव्ह जिहाद प्रकरण… कायदा सुव्यवस्था ऑक्सिजनवर?

आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण

दौंड तालुक्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांची साखळी पाहता एक गंभीर प्रश्न समोर येतो — तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे का?
यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर उसळलेली दंगल, त्यानंतरचे पडसाद, दौंड शहरात जैन समाजावरील कथित अन्याय-अत्याचार प्रकरण, पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर कोयत्याने मारहाण, कुरकुंभ औद्योगिक परिसरातील रसायन चोरी, गॅस तस्करी, मादक पदार्थांची हालचाल, पाटस-दौंड रोडवरील हॉटेल जगदंबा येथे गॅस स्फोटात परप्रांतीयांचा मृत्यू आणि बनावट दारू निर्मितीच्या टोळी अशी सगळ्या घटना वेगळ्या नाहीत, तर एका मोठ्या चित्राचा भाग आहेत, अशी चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे.

या प्रत्येक प्रकरणात तपास यंत्रणेकडून संपूर्ण माहिती बाहेर आली का?
दंगलीतील खरे सूत्रधार कोण?
कुरकुंभातील रसायन चोरी प्रकरणाचा शेवट काय?
हॉटेल स्फोटातील नेमकी कारणमीमांसा काय?
आणि बनावट दारू प्रकरणी पुढे काय घडले असे
अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलीस प्रशासनाकडून “गोपनीयता” पाळली जाते, पण त्यातून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. काही प्रकरणांमध्ये माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये याची विशेष खबरदारी घेतली जाते, अशी नागरिकांची तक्रार आहे.
गुन्हेगारीला राजकीय आशीर्वाद?
तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीकडे पाहताना नागरिक थेट प्रश्न विचारू लागले आहेत —
गुन्हेगारांना कुणाचा आशीर्वाद आहे का?
राजकीय दबावामुळे तपासावर मर्यादा येतात का?
विकासकामांच्या जाहिरातींमध्ये लोकप्रतिनिधी आघाडीवर असतात. पण त्याच तालुक्यात कायदा-सुव्यवस्था ढासळत असेल, तर त्यावर ठोस भूमिका का दिसत नाही? ही बाब अधिक चिंताजनक आहे. परिणामी बोट लोकप्रतिनिधींकडेच जाते.

स्वामी चिंचोली येथील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने तर राज्यभरात खळबळ उडवली. सुरुवातीला अपहरणाचा आरोप, त्यानंतर मुलीचे स्टेटमेंट, स्टॅम्पवर नोकरीचे पत्र दाखवणे, विविध हिंदू संघटनांचे आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राहुल जगताप यांची भाषणे — या साऱ्यामुळे वातावरण तापले.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी राहुल कुल यांच्या नावाशीही या प्रकरणाची सांगड घालण्यात आली. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली, तरी सोशल मीडियावरील टीका थांबलेली नाही. यामुळे राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे.

या सततच्या घटनांमुळे दौंड तालुक्याची प्रतिमा डागाळते आहे. गुन्हेगार मात्र सुरक्षित राहतात आणि सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत जगतात. उद्योगनगरी कुरकुंभमध्ये गुन्हेगारी वाढल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दौंड व यवत पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे का?
तपास प्रक्रियेत पारदर्शकता का दिसत नाही?
गुन्हेगारांवर कठोर कारवाई का होत नाही?
राजकीय हस्तक्षेप आहे का?
हे प्रश्न केवळ सोशल मीडियावर नाहीत, तर सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाले आहेत.
दौंड तालुका खऱ्या अर्थाने गुन्हेगारीच्या रस्त्यावर चालला आहे का?
जर नाही, तर प्रशासनाने ठोस आकडेवारी, पारदर्शक तपास आणि कडक कारवाईद्वारे नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा “कायदा-सुव्यवस्था ऑक्सिजनवर” असल्याची भावना अधिक बळावेल, यात शंका नाही.