दौंड  नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी झाडू हातात घेतल्याने ; दौंडमध्ये स्वच्छतेवरून नव्या चर्चांना उधाण!?

नगराध्यक्षा दुर्गादेवी कचरा भरताना

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
दौंड, प्रतिनिधी : दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेत झाडू हाती घेतला व कचरा उचलला. त्यांच्या सोबत काही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला. या कृतीमुळे शहरात विविध प्रतिक्रिया उमटत असून स्वच्छतेच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
“माझे शहर – माझे घर” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. शहरातील स्वच्छतेच्या उणिवा दूर करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शहरातील स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात गटारींची दुरवस्था, रस्त्यांवरील कचरा, बेशिस्त पार्किंग, मोकाट जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. खर्चाच्या मानाने सुविधा मिळाल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही नागरिकांनी नगराध्यक्षांच्या कृतीचे स्वागत करून ती सकारात्मक सुरुवात असल्याचे मत व्यक्त केले. तर काहींनी याकडे ‘फोटो स्टंट’ म्हणून पाहत केवळ प्रतीकात्मक कृतीवर न थांबता ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
दौंड हे विद्वान व विचारवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर व्यापक जनजागृती आणि संघटित प्रयत्न दिसून येत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे.
नगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहरात अपेक्षित बदल झाला नसल्याचे अनेकांचे मत आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे या उच्चशिक्षित असून सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून येतात. शहरातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, त्यांच्या स्वच्छता मोहिमेतील सहभागानंतर आता पुढे ठोस कृती आराखडा जाहीर होणार का, तसेच स्वच्छतेसाठी होणाऱ्या खर्चाचा हिशेब पारदर्शकपणे मांडला जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दौंडकर या उपक्रमाकडे केवळ प्रतीकात्मक घटना म्हणून पाहतात की शहरबदलाची सुरुवात म्हणून स्वीकारतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.