कुरकुंभ, रावणगाव परिसरात अवैध धंद्यांचे साम्राज्य
पोलीस प्रशासनाचे अभय की हतबलता? नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरन

दौंडच्या औद्योगिक पट्ट्यात ‘राजकीय’ गुन्हेगारी फोफावली;

विशेष वृत्त: आवाज लोकशाहीचा

दौंड (प्रतिनिधी):
दौंड तालुक्याच्या मध्य पट्ट्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद आणि रावणगाव हा भाग सध्या अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू बनला आहे. राजकीय आशीर्वादाने या भागातील तरुणांनी गुन्हेगारी विश्वात शिरकाव केला असून, गेल्या तीन महिन्यांपासून रसायन चोरी, गॅस रिफिलिंग आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रकार उघडपणे सुरू आहेत. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
कंपन्यांमध्ये ‘ठेकेदारी’च्या नावाखाली दहशत
कुरकुंभ आणि पांढरेवाडी परिसरातील रासायनिक औद्योगिक वसाहतींमध्ये ठेकेदारी मिळवण्यासाठी राजकीय बळाचा वापर केला जात आहे. अनेक राजकीय आश्रित कार्यकर्त्यांनी कंपन्यांचे मालक, चालक आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरले असून, त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. “राजकीय आशीर्वाद” असल्याने पोलीसही या गुंडांवर कारवाई करण्यास धजावत नसल्याची तक्रार नागरिक दबक्या आवाजात करत आहेत.
दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरकुंभ आणि रावणगाव पोलीस चौकीचा कारभार सध्या सर्वाधिक चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.
प्रशासकीय गोंधळ: येथील काही कर्मचाऱ्यांचे वर्तन संशयास्पद असून, ते स्वतःला पोलीस स्टेशनचे प्रमुख समजून वागत आहेत.
खाजगी एजंटची नेमणूक: कुरकुंभ चौकीतील एका कर्मचाऱ्याने अवैध वसुलीसाठी चक्क खाजगी तरुणांची टोळी तयार केली असून, कमिशन तत्त्वावर वसुली सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे.
बदलीची मागणी: भ्रष्ट कारभाराला कंटाळून या कर्मचाऱ्यांची तात्काळ पोलीस मुख्यालयात बदली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
“सध्या परिस्थिती अशी आहे की, ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीदवाक्य उलट्या दिशेने प्रवाहित होताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचेच संरक्षण मिळत असेल, तर दाद कोणाकडे मागायची हा मोठा प्रश्न आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी चांगले काम करण्यास इच्छुक आहेत. मात्र, चौकी स्तरावरील काही ‘सुभेदार’ पोलिसांचे राजकीय लागेबांधे इतके वरपर्यंत आहेत की, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. यामुळे पोलीस विभागातच अंतर्गत नाराजी असून, प्रामाणिक कर्मचारी हतबल झाले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष न दिल्यास, या परिसरात बिहार राज्यासारखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या होणारे हल्ले, कंपन्यांची लूट आणि तस्करी अशा प्रकारांमुळे राज्याच्या औद्योगिक प्रतिमेला तडा जाऊ शकतो.