आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले, तरी निकाला पूर्वीची एक दिवस-एक रात्रीची प्रतीक्षा उमेदवारांसह समर्थकांसाठी अस्वस्थ करणारी ठरत आहे. मात्र या प्रतीक्षे पेक्षा अधिक चिंतेची बाब म्हणजे गावागावात सक्रिय होणारे ‘कानफुके’ आणि चुगलीखोर कार्यकर्ते.
निवडणुकीचा निकाल कोणासाठी विजय, तर कोणासाठी पराजय ठरणार हे स्पष्ट होईल; पण त्यानंतरही गावातील एकोपा अबाधित राहील का, हा मोठा प्रश्न आहे. अनेक गावांत काही कार्यकर्ते हेतुपुरस्सर अफवा पसरवणे, एका गटाची दुसऱ्या विरोधात कान भरणी करणे, जुने वाद उकरून काढणे अशा प्रकारे भांडणे लावण्याचे काम करतात.
यामुळे जीवाभावाचे मित्र, सखे-सोयरे, शेजारी यांच्यात दुरावा निर्माण होतो. अनेक वर्षांचे सलोख्याचे संबंध ताणले जातात आणि गावात अपक्ष दुश्मनीचे वातावरण तयार होते. गावाच्या एकसंघ विकासाला यामुळे अडथळे निर्माण होतात.
बगल बच्च्यांचे राजकारण
काही राजकीय नेतेही अशा ‘खबरी लाल’ कार्यकर्त्यांवर अवलंबून राहतात. मिळालेल्या माहितीची शहानिशा न करता एकतर्फी निर्णय घेतले जातात. परिणामी अनावश्यक विरोधक निर्माण होतात. नेतृत्वा भोवती एकजूट राहू नये, यासाठीच काही कार्यकर्ते सतत कान फुकीची कार्यपद्धती राबवत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसते.
मतदानाच्या काळात घराघरांत, शेजारीपाजारी राजकीय वैर वाढताना दिसते. याचा सर्वाधिक परिणाम तरुणांवर होतो. सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन मिळण्याऐवजी तरुणांना गटबाजीच्या राजकारणात ओढले जाते. गावातील प्रश्नांवर सर्वानुमते विचारविनिमय करण्याची परंपरा मागे पडते.
विकासाऐवजी वादाची बीजे
कष्ट करून स्वतःचे आयुष्य उभे करण्याऐवजी काहीजण गावकीच्या पैशातून, पदांच्या आशेवर स्वतःचा प्रपंच चालवण्याच्या भूमिकेत असतात. भेदभाव वाढवणे, तरुणांमध्ये वाद लावणे आणि विकास कामांवर परिणाम घडवणे—या प्रवृत्ती गंभीर आहेत.
निवडणुका संपल्या म्हणजे वैर संपले पाहिजे, हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत आहे. गावाचा एकोपा, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येणे गरजेचे आहे. नेत्यांनीही अशा कान फुक्या, भुरट्या प्रवृत्तीं पासून दोन हात दूर राहून गावाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे.
निकाल काहीही लागो, गाव आणि गावकरी हेच अंतिम सत्य आहे. लोकशाहीवरील ठाम विश्वास टिकवायचा असेल, तर निवडणुकीनंतर एक संघतेचा संदेश देणे हीच खरी काळाची गरज आहे.



