प्रचार थांबला दिवसाचा… सुरू झाला रात्रीचा!कत्तलकी रात्र की लोकशाहीची संधी?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
प्रचार थांबला दिवसाचा… सुरू झाला रात्रीचा!
अंतिम टप्प्यातील ‘छुपा प्रचार’ आणि मतदारांची कसोटी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची अधिकृत सांगता होताच गावोगावी शांतता पसरल्याचे चित्र दिसते. पण ही शांतता केवळ वरवरची असते. दिवसाचा प्रचार थांबतो आणि रात्रीचा ‘छुपा प्रचार’ सुरू होतो, अशी वस्तुस्थिती अनेक वर्षांपासून ग्रामीण राजकारणात पाहायला मिळते.
दिवसा उजळ माथ्याने मतदारांना भेटणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रात्रीच्या अंधारात गुपचूप घरांची दारे ठोठावताना दिसतात. मनधरणी, आणाभाका, भावनिक साद, आणि काही ठिकाणी आर्थिक प्रलोभने—या साऱ्यांचा खेळ या अंतिम टप्प्यात रंगतो. सर्वांनाच हे माहित असते; मात्र उघडपणे बोलण्याची हिंमत फारच कमी जण दाखवतात.
फिटिंग’ची बढाई आणि लाचार कार्यकर्त्यांची धावपळ
निवडणूक आली की गावात भुरट्या आणि भामट्या कार्यकर्त्यांची कोल्हेकुई वाढते. “मी इकडे फिट केलं, तिकडे फिट केलं” अशी बढाई मारणारे, घरात किंमत नसलेले काही कार्यकर्ते नेत्यांसमोर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतात. उगाच पळापळ, फोनाफोनी, गाड्यांमध्ये बसण्याची चढाओढ—या सगळ्यात मतदारांपेक्षा स्वतःचा स्वार्थ जपण्याचीच स्पर्धा अधिक असते.
“बेगमी शादीने अब्दुला दिवाणा” या म्हणीप्रमाणे काहींची अवस्था होते. स्वतःचा काही संबंध नसतानाही धावपळ करून आपणच सर्व काही घडवून आणले, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो.
नोटेची घडी आणि मतदारांची परीक्षा
मतदारांच्या घरोघरी मतदान क्रमांक पोहोचवताना नकळत एखाद्या कागदाच्या घडीत महात्मा गांधींचे चित्र असलेली नोट ठेवली जाते, अशी चर्चा नेहमी ऐकू येते. ही केवळ अफवा आहे की वस्तुस्थिती, हे तपासण्याचे काम प्रशासनाचे आहे; पण समाजात अशी चर्चा होत असेल, तर लोकशाहीची पायाभरणीच डळमळीत होत असल्याचे संकेत आहेत.
संध्याकाळी मटणाच्या जेवणाची सोय, वाहनव्यवस्था, आणि रोख रकमेची देवाणघेवाण—या सर्व गोष्टी काही मतदारांसाठी पर्वणी वाटू शकतात. पण पाच वर्षांचा विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक कारभार या मुद्द्यांवर विचार न करता घेतलेला निर्णय गावाच्या भविष्यावर घाला घालू शकतो.
ही कत्तलकी रात्र की लोकशाहीची संधी?
अंतिम रात्रीचा हा प्रचार अनेकदा मतदारांच्या विवेकाची ‘कत्तल’ करणारा ठरतो. पैशाच्या आणि प्रलोभनांच्या आधारे घेतलेले निर्णय पुढील पाच वर्षे गावाला भ्रष्टाचार, निकृष्ट कामे आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांच्या गर्तेत ढकलू शकतात.
लोकशाही केवळ मतदानाचा हक्क नाही; तो जबाबदारीचा क्षण आहे. एक नोट, एक जेवण किंवा क्षणिक लाभासाठी दिलेले मत भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करू शकते.
मतदारांना आवाहन
प्रलोभनांना बळी पडू नका.
उमेदवाराचा पाच वर्षांचा कामाचा लेखाजोखा तपासा.
प्रश्न विचारा, उत्तरांची मागणी करा.
मतदान हा व्यवहार नाही; तो भविष्याचा निर्णय आहे.
लोकशाही जपायची असेल, तर अंतिम रात्रीच्या ‘छुप्या प्रचाराला’ नकार देण्याची ताकद मतदारांनी दाखवली पाहिजे. कारण खरी सत्ता पैशात नाही, तर मतदाराच्या बोटावर उमटणाऱ्या शाईत असते.