खडकी-देऊळगाव राजे गटात अटक–सुटकेचे नाट्य; छुप्या प्रचाराला वेग, अफवांचा सुळसुळाट?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
खडकी-देऊळगाव राजे गटात अटक–सुटकेचे नाट्य; छुप्या प्रचाराला वेग, अफवांचा सुळसुळाट सुरू झाला आहे?
दौंड – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा अधिकृत प्रचार ५ तारखेला रात्री दहा वाजता संपला आणि त्यानंतर लगेचच छुप्या हालचालींना वेग आल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. विशेषतः दौंडच्या पूर्व भागातील खडकी–देऊळगाव राजे गटात प्रचाराच्या सांगतेच्या काही तास आधी घडलेले एका अपक्ष उमेदवाराच्या अटक–सुटकेचे नाट्य राजकारणात खळबळ उडवणारे ठरले आहे.
सदर प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असले तरी “या मागे राजकीय षडयंत्र होते का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे. अटक आणि काही तासांत सुटका—या घडामोडींनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, यावर विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
२४ तासांचा ‘गेम प्लॅन’?
प्रचारबंदी लागू झाल्यानंतर उरलेला एक दिवस आणि एक रात्र हा विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरला जातो, असा आरोप वारंवार केला जातो. मतदारांना बदनाम करणे, विरोधकांविरोधात अफवा पसरवणे, मतदार खरेदी-विक्रीची भाषा बोलणे—या छुप्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच अटक–सुटकेचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संबंधित अपक्ष उमेदवाराने अमुक-तमुक उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला, अशा स्वरूपाच्या वावड्या काही कार्यकर्त्यांकडून पसरवल्या जात असल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज अंतिम झाल्यानंतर मतदान प्रक्रियेत उमेदवाराचे नाव आणि चिन्ह हटवता येत नाही, हे निवडणूक नियम स्पष्ट सांगतात. तरीही “पाठिंबा दिला”च्या अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे ही बालिश राजकीय अपेक्षा ठरते.
अशा अफवांमुळे मतदारांचा अपमान होतोच; पण त्या पसरवणाऱ्यांचीही विश्वासार्हता संपुष्टात येते. निवडणुकीत विजय-पराजय ठरलेलाच असतो; मात्र मतदारांचा प्रामाणिक कौल मिळवण्याऐवजी डावपेच, अफवा आणि संभ्रम यांवर राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची प्रतिमा जनतेत “लुच्चा-लफंगा” अशीच तयार होते, अशी चर्चा गावागावांत ऐकू येत आहे.

खडकी–देऊळगाव राजे गट सध्या तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि अपक्ष उमेदवार यांच्या चुरशीमुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय कोणाच्या पदरात पडणार, यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार असली तरी सध्या मतदार कोणाला निवडून देणार आणि कोणाला आपटणार याबाबत दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.
निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे. अटक–सुटकेचे नाट्य, पाठिंब्याच्या अफवा आणि छुप्या हालचालींनी जर मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीच्या मूल्यमापनावरच प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. अंतिम निर्णय मतदारांच्या बोटावर उमटणाऱ्या शाईतूनच होणार आहे—अफवांच्या धुरातून नाही.हे अफवा पसरवणाऱ्या कोणी तरी सांगेल का?