मतदार भिकारी आहे का? – लोकशाहीवरचा थेट हल्ला!?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
मतदार भिकारी आहे का? – लोकशाहीवरचा थेट हल्ला
“कामे केली नाहीत तरी चालतात. निवडणुकीच्या तोंडावर दारू, मटण आणि वरून थोडी रोकड दिली की मतदार येऊन आपोआप बटन दाबतो.” ही चर्चा दौंड तालुक्यात आहे ,
हे वाक्य आवाज लोकशाहीचे नाही, तर दौंड तालुक्यातील  राजकारणी आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या तोंडून खुलेआम ऐकू येत आहे. ही केवळ भाषा नाही, ही लोकशाहीचा अपमान करणारी मानसिकता आहे.
मतदारांना विकत घ्यायचे, सत्तेवर जायचे, सत्तेतून पैसा कमवायचा आणि तोच पैसा पुन्हा मतदार खरेदीसाठी वापरायचा—हा फंडा आज दौंड तालुक्यात राज्यकर्त्यांसाठी अतिशय सोपा आणि सोयीस्कर बनला आहे. इतकेच नाही तर “आम्हीच निवडणूक जिंकणार, मतदार विकत घेणार” अशी भाषा आता राजरोसपणे बोलली जात आहे. ही भाषा ऐकूनही जर समाज गप्प बसत असेल, तर तो केवळ शांत नाही तर सहभागी दोषी ठरतो.
आज निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर, कामाच्या अहवालावर किंवा शब्दांच्या विश्वासावर लढवल्या जात नाहीत. त्या लढवल्या जात आहेत दिवसभरच्या झुंडीवर, संध्याकाळच्या हॉटेल–ढाब्यांवरील पार्ट्यांवर आणि रात्रीच्या दारूच्या अड्ड्यांवर. “हा आमचा हाडाचा कार्यकर्ता, विश्वासू आहे” अशा शब्दांचा भडीमार होत असतो; पण प्रत्यक्षात विश्वास विकला जातो—तोही कोंबड्या-बकऱ्याच्या भावापेक्षा कमी किमतीत.
मतदानाच्या आदल्या रात्री होणाऱ्या गोंधळाला “मतदार लक्ष्मी आली दारी” असे गोंडस नाव दिले जाते. पण ही लक्ष्मी नाही, ही लोकशाहीची विक्री आहे. आज मत विकणारा मतदार उद्या ज्या उमेदवाराला विजयी करतो, तोच उमेदवार पुढील पाच वर्षे त्या पैशाची वसुली भ्रष्टाचारातून करतो—आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीत याच मतदारांना दारू-मटणावर फितूर करण्याची तयारी करतो. हे दुष्टचक्र आहे आणि त्यात लोकशाहीची टिंगल उडवली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अमूल्य मतदानाधिकाराचे शस्त्र आज बाजारात खुलेआम विकले जात आहे. ते विकत घेणारे मात्र स्वतःला समाजसेवक म्हणवून घेतात, आणि सत्तेच्या आड भ्रष्टाचारातून आर्थिकदृष्ट्या बलवान होतात. हाच आजच्या निवडणुकांचा खरा चेहरा आहे.
प्रश्न साधा आहे—
दौंडचा मतदार भिकारी आहे का?
की त्याला तसे समजून वागवले जात आहे?
जर मतदारांनी आजही डोळे उघडले नाहीत, तर उद्या दारू-मटण देणारेच त्यांचा विकास, त्यांचे पाणी, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांचे भविष्य ठरवतील.
ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्याची नाही—ती मतदाराच्या स्वाभिमानाची परीक्षा आहे.मात्र त्यालाच विकत घेणारी भाषा होते आणि म्हणून तो भिकारी आहे का ?