पुणे/वरवंड (आवाज लोकशाहीचा): पुणे जिल्ह्यातील वरवंड (पुनर्वसन) परिसरातील मंदिराजवळ सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटी करणाच्या कामाचा दर्जा पाहता, हे काम म्हणजे ‘राज्याला दिशा देणारा विकास’ नसून ‘निकृष्ट कामाचा नमुना’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. ठेकेदार, प्रशासन आणि पाठीशी घालणारे राजकीय वरदहस्त यांच्या संगनमताने तालुक्यात निकृष्ट कामांची जणू स्पर्धाच लागली आहे, असा गंभीर आरोप आता होऊ लागला आहे.
माहितीचा फलक गायब; पारदर्श कतेचा बोजवारा
शासकीय नियमांनुसार कोणत्याही विकास कामाच्या ठिकाणी कामाचे स्वरूप, अंदाजित खर्च आणि ठेकेदाराचे नाव असलेला माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, वरवंड मधील या कामाचा फलक जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून किती कोटींचा निधी खर्च होतोय, हे गावकऱ्यांना समजू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. हा लपवा छपवीचा प्रकार कुणाच्या फायद्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकारी हॉटेलमध्ये आणि कामाचा बोजवारा!
रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून देखरेख करणे आवश्यक असते. मात्र, “काम सुरू असताना अधिकारी हॉटेलमध्ये पार्ट्या झोडण्यात मग्न होते,” असा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे ठेकेदाराला रान मोकळे मिळाले असून, राजकीय आशीर्वादाने हा ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.
‘टक्केवारी’चा रोग आणि लाचार झालेली यंत्रणा
गेल्या २५ वर्षांपासून तालुक्यात विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी आणला जात आहे. मात्र, या निधीला ‘टक्केवारी’च्या रोगाने ग्रासले आहे.
आर्थिक लूट: अधिकारी, ठेकेदार आणि पडद्यामागचे राजकीय सूत्रधार आर्थिकदृष्ट्या भक्कम होत असताना, जनतेच्या वाट्याला मात्र खड्डेमय आणि निकृष्ट रस्ते येत आहेत.
प्रसारमाध्यमांची लाचारी: दुर्दैवाची बाब म्हणजे, या भ्रष्टाचारावर वाचा फोडणारे काही प्रसारमाध्यम प्रतिनिधीच आता ठेकेदार बनले आहेत. स्वाभिमान गहाण ठेवून ही मंडळी भ्रष्टाचाराच्या या साखळीत सामील झाल्याने सामान्यांचा आवाज दाबला जात आहे.
“वरवंडमधील या रस्त्याकडे पाहिल्यावर तालुक्यातील सामाजिक कामांचे ‘प्रदर्शन’ भरवण्याची वेळ आली आहे. राज्याच्या विकासकामात हे काम नक्कीच ‘लक्षवेधी’ ठरेल,” अशी खोचक टीका नागरिक करत आहेत.
जनतेचा सवाल: आमचा पैसा जातोय कुठे?
रस्ते कामाच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘काळा बाजार’ थांबणार कधी? असा सवाल वरवंडकर विचारत आहेत. एका बाजूला तालुक्यात विकासाची मोठी जाहिरात केली जात असताना, प्रत्यक्षात मात्र निकृष्ट कामांचा डोंगर उभा केला जात आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




