दौंड तालुका म्हणजे विकासाचे केंद्र की भ्रष्टाचाराचे आगार?विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा उघड बाजार!?

आवाज लोकशाहीचा..विजय चव्हाण..
दौंड तालुका : विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा उघड बाजार!
दौंड तालुका म्हणजे विकासाचे केंद्र की भ्रष्टाचाराचे आगार?
हा प्रश्न आता शंका नसून थेट आरोप ठरण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यात हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांची आकडेवारी फलकांवर झळकते आहे, भाषणांमधून गाजते आहे आणि सोशल मीडियावर प्रचाराचा पाऊस पडतो आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेला विकास शोधायला नागरिकांना भिंग घ्यावे लागत आहे.

४०९ कोटी ४० लाख रुपयांचा एक रस्ता —
पंधरा दिवसांपासून नागरिकांना, पत्रकारांना, सोशल मीडियावर काम करणाऱ्यांना सापडत नाही!
मात्र या रकमेचे माहिती फलक गावोगावी, तालुकाभर लावले गेले होते, ते सर्वांनी वाचले, पाहिले.
मग प्रश्न साधा आहे —
रस्ता कुठे आहे? पैसा कुठे गेला? काम कोणी केले?
तालुक्याला जवळपास १६०० कोटींपेक्षा अधिक निधी सामाजिक विकासाच्या नावाखाली आणल्याचा गवगवा झाला.
प्रत्यक्षात मात्र —
निधी नेमका किती?
कामे कोणती?
कोणी केली?
कधी पूर्ण झाली?
झालीच आहेत का?
या प्रश्नांची उत्तरे देणारा एकही जबाबदार चेहरा समोर येत नाही.
रस्तेच नव्हे, पिण्याचे पाणीही भ्रष्टाचाराच्या विळख्यात
या तालुक्यात भ्रष्टाचार फक्त रस्त्यांपुरता मर्यादित नाही.
थेट नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडित असलेल्या पिण्याच्या पाण्यावरही डल्ला मारला जातोय.
२०१८ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) आणि जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत.
सात वर्षे उलटली —
कामे अपूर्ण, नळ कोरडे, पिण्याचे पाणी विकत घेऊन नागरिकांचे जगणे!
पाण्यासारख्या मूलभूत गरजेवरही भ्रष्टाचार करणारी ही यंत्रणा नक्की कोणाच्या आशीर्वादावर चालते?
ठेकेदार, अधिकारी आणि त्यांच्यामागे उभे असलेले अदृश्य राजकीय हात —
हा संपूर्ण साखळीबद्ध लूट उद्योग नाही तर काय?
जनतेच्या नावावर पैसा, लाभ मात्र ठराविकांच्या खिशात!
तालुक्यासाठी शासनाचा पैसा आणायचा,
जनतेच्या नावावर फलक लावायचे,
आणि प्रत्यक्ष लाभ मात्र काही ठराविक मंडळींनी उचलायचा —
हा उद्योग रोजचा झाला आहे का?
आज दौंड तालुक्यात उभा राहिलेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे —
जनतेच्या नावावर आणलेल्या पैशांची खुलेआम लूट सुरू आहे का?
जर उत्तर ‘नाही’ असेल,
तर हिशेब द्या! कामे दाखवा! दोषींवर कारवाई करा!
अन्यथा,
दौंड तालुका हा विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा प्रयोगशाळा बनला आहे,
असे ठामपणे म्हणण्याची वेळ आता आली आहे.