यवत पोलीस कर्मचारी बेपत्ता – तपासावर प्रश्न चिन्ह?DySP धडस संशयाच्या भोवऱ्यात; पत्नीचा आक्रोश, विभागात खळबळ!



आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…

यवत पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे बेपत्ता झाल्याला ४८ तास पूर्ण झाले असतानाही त्यांचा कोणताही तपास लागत नसल्याने हा मुद्दा गंभीर वळण घेत आहे. या प्रकरणातील तपासाविषयी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) बापूराव धडस यांच्या भूमिकेवर सरळ संशय व्यक्त होऊ लागला आहे.

निखिल यांची पत्नी अक्षदा रणदिवे यांनी धडस यांच्या कारभारावरील अविश्वास जाहीर करत तपास त्यांच्याकडून काढून, निखिलवर अन्याय झाल्याचा आरोप असलेल्या यवत पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या संदर्भातील चौकशी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी केली आहे.

अक्षदा यांनी याबाबतचे निवेदन ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांना दिले असून त्यांनी या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फोनद्वारे दिल्याचे समजते.

भावनिक मेसेज व्हायरल; दलात खळबळ

५ डिसेंबर रोजी दुपारी निखिल रणदिवे यांचा वेदनादायी मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मेसेज मध्ये त्यांनी लिहिले—
“यवतचे अधिकारी नारायण देशमुख वर्षभर अत्याचार करत आहेत…
माझ्या मुलीच्या वाढदिवशी येऊ शकणार नाही… ही शेवटची शुभेच्छा…”

या मजकुराने पोलीस विभागासह सर्वत्र चंगळबळ उडवून दिली. मेसेज व्हायरल झाल्यानंतर निखिल चा फोन बंद मिळत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली.


६ डिसेंबरला अक्षदा रणदिवे काही नातेवाइकांसह यवत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. याच वेळी DySP धडस पत्रकारांशी बोलत असताना अक्षदा अचानक धावत येत संतापाने ओरडल्या
माझा नवरा कुठे आहे? मला आत्ताच्या आता हवा आहे!
जसा होता तसाच हवा… माझ्या मुलांचा बाप गायब कसा?”

त्यांनी नारायण देशमुख यांनी वर्षभर छळ केला, असा थेट आरोप करत धडस यांच्या तपासा वरील शंका अधिक तीव्र केली

सायंकाळी अक्षदा यांनी SP संदीपसिंग गिल यांच्या भेटीसाठी दौंडला धाव घेतली, मात्र प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. यामुळे कुटुंबीयांचा संताप व अस्वस्थता आणखी वाढल्याचे समजते.
तपास अधिकारीच संशयित; कुटुंब तळमळते, नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

एका बाजूला दोन लहान मुलांचे वडील बेपत्ता, तर दुसऱ्या बाजूला तपास करणारा अधिकारीच शंकेच्या भोवऱ्यात… अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
निखिल रणदिवे लवकरात लवकर सापडावेत आणि प्रकरणातील प्रत्येक तथ्य समोर येऊन सत्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अक्षदा रणदिवे यांनी sp कडे पाठविलेला अर्ज