दौंड तालुक्यातील राजेगावच्या उजनी पात्रातून ‘काळ्या सोन्याची’ अहोरात्र लूट; मंडळ अधिकाऱ्यांच्याच भागीदारीची चर्चा!

आवाज लोकशाहीचा..
राजेगाव, दि. १७ (प्रतिनिधी):
येथील उजनी धरणाच्या फुगवटा (संपादित) क्षेत्रातून गेल्या दहा दिवसांपासून अहोरात्र बेकायदेशीर माती उपसा सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्याला महसूल विभागाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, यामध्ये स्थानिक मंडळ अधिकाऱ्यांची (सर्कल) थेट भागीदारी असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. ‘रक्षकच भक्षक’ बनल्याने नदीपात्राचे लचके तोडणाऱ्या माती तस्करांचे धाडस कमालीचे वाढले आहे.

उजनीच्या या ‘काळ्या सोन्याला’ सध्या विटभट्टी चालकांकडून मोठी मागणी आहे. यातूनच राजरोसपणे लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बेकायदेशीर माती उपशाबाबत जर एखाद्या जागरूक नागरिकाने महसूल विभागाकडे तक्रार केली, तर संबंधित मंडळ अधिकारी तात्काळ त्या तक्रारदाराचे नाव माती तस्करांना पोहोचवत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नाव समजताच तस्करांकडून संबंधित नागरिकांना प्रत्यक्ष किंवा फोनवरून थेट जीवे मारण्याची आणि गंभीर परिणामांची दमदाटी केली जात आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे.
प्रतिदिन ५० हजारांचा हप्ता?
उजनीच्या संपादित क्षेत्रातून दररोज शेकडो ब्रास माती विनापरवाना उपसली जात आहे. हा काळा धंदा सुरळीत सुरू राहावा आणि प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी माती तस्करांकडून संबंधित मंडळ अधिकाऱ्याला दररोज तब्बल ५० हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा पंचक्रोशीत दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळेच की काय, डोळ्यांदेखत शासकीय मालमत्तेची लूट होत असतानाही महसूल यंत्रणेने पूर्णपणे डोळेझाक केली आहे.
हवेत गोळीबार; ?परिसरात भीतीचे सावट?
या माती तस्करांचे जाळे अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे बोलले जाते. यातील काही प्रमुख तस्करांकडे बेकायदेशीर पिस्तूल आणि घातक हत्यारे असल्याची जोरदार चर्चा आहे. नदीपात्रात रात्री-अपरात्री अवैध उपसा सुरू असताना, दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला जात असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या शांततेत येणाऱ्या गोळीबाराच्या आवाजामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

“शासकीय जमिनीचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी तस्करांच्या दावणीला बांधले गेल्याने आता दाद मागायची कोणाकडे?” असा संतप्त प्रश्न राजेगावकर करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, संबंधित लाचखोर मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करून त्याची हकालपट्टी करावी आणि शस्त्र बाळगणाऱ्या माती तस्करांवर ‘मोक्का’अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता राजेगावच्या नागरिकांमधून केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास लोकप्रतिनिधींना धारेवर धरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

राजेगावला माती उत्खनन झालेल्या भूखंडाचे चित्र