‘आवाज लोकशाहीचा’ विशेष वृत्त:
दौंड (विशेष प्रतिनिधी, विजय चव्हाण):
लावणी आणि तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल लोककला. या कलेची कदर करणारे रसिक पूर्वी कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव करायचे. मात्र, अलीकडच्या काळात कलेची दाद देण्यासाठी येणारे रसिक हातात टाळ्यांऐवजी थेट ‘पिस्तूल’ घेऊन येऊ लागल्याने “नक्की कला बदलली आहे की रसिक?” असा संतप्त आणि तितकाच भेडसावणारा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चौफुला येथील प्रसिद्ध ‘रेणुका कला केंद्रावर’ घडलेल्या ताज्या प्रकाराने संपूर्ण दौंड तालुक्यासह सांस्कृतिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारच्या सुमारास चौफुल्यातील रेणुका कला केंद्राच्या थिएटरमध्ये काही रसिकांमध्ये आपापसात जोरदार भांडण सुरू झाले. वाद इतका विकोपाला गेला . या राड्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला आहे.
या पैकी एकाकडे पिस्तूल होता , पोलिसांना याचि खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी एकाकडे पिस्तूल असल्याचे समजले
पोलिसांची माहिती होताच त्याने पळ काढला मात्र त्याला पकडण्यात पोलिसाना यश आलेले आहे त्याच्यासह दोघांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यवत पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी संतोष तासगावकर आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने आणि वाघजकर यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास या संशयित तिघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कला केंद्रावर आणले होते. पोलिसांनी तत्परता दाखवत कट्ट्यासह आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या, तरी या प्रकरणी नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याची सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही.
दौंड तालुक्यात अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात तीन मोठी लोकनाट्य कला केंद्र आहेत. अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन अनेक रसिक येथे नाच-गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात. मात्र, याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवघ्या ११ महिन्यांपूर्वी (जुलै २०२५ मध्ये) ‘न्यू अंबिका लोकनाट्य कला केंद्र, वाखारी’ येथे ‘ नाचगण्याच्या प्रकरणी थेट गोळीबार करण्यात आला होता. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते. त्या घटनेचा खरा तपास पुढे काय झाला, हे जनतेला अजून समजलेले नसतानाच, आता ‘रेणुका कला केंद्रावर’ थेट गावठी कट्टा सापडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
कला केंद्रांवर पिस्तूल आणण्याची ही नवी घातक पद्धत कलेचा आदर करण्यासाठी आहे की कलावंतांना वेठीस धरण्यासाठी? तमाशा कलावंतांची रात्र ही त्यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय आहे, मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे हा व्यवसाय आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे.
कलेला दाद देण्याचे सोडून कधी हवेत गोळीबार करणे, तर कधी कमरेला कट्टा लावून फिरणे हीच अलीकडे या लोकनाट्य कला केंद्रांची नवी ओळख बनू पाहत आहे. अशा कृत्यांमुळे केवळ कला केंद्रच बदनाम होत नसून, संपूर्ण परिसराला आणि गावाला बदनामीचा डाग लागत आहे. कमरेला पिस्तूल लावून येणारे हे कसले रसिक? हे ‘कलेचे भुकेलेले’ आहेत की कोणत्या ‘भलत्याच’ हेतूने येतात? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
शासनाने आणि पोलीस प्रशासनाने या संपूर्ण भानगडीची अत्यंत प्रामाणिक अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी. या कला केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी नेमके काय चालते? याची झाडाझडती घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तथाकथित रसिकांना तात्काळ आळा घालावा. अन्यथा, आगामी काळात ही कला केंद्रे गुन्हेगारीचा अड्डा म्हणून ओळखली जातील यात शंका उरणार नाही




