रस्ता नाही… पण बिल काढलं! दौंड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा धक्कादायक कारनामा?

आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण विशेष वृत्त

दौंड तालुक्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा आणखी एक संशयास्पद प्रकार समोर आला असून, रस्ता न करताच तब्बल १० लाखांहून अधिक रकमेचे बिल काढल्याचा गंभीर आरोप आता पुढे येत आहे. हिंगणीगाडा ते जिरेगाव या मार्गासाठी दाखवलेले काम प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे चित्र समोर आले आहे.

घटनास्थळी उभारण्यात आलेला कामाचा फलक हा केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. फलकाच्या पुढे-मागे सुमारे २०० मीटर अंतरात रस्त्याचा मागमूसही नाही, त्यामुळे या कामावर खर्च दाखवलेली रक्कम कुठे गेली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी श्री. फुलारी यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी “मला पाहावे लागेल” अशी वेळ मारून नेण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, वरिष्ठ अधिकारी श्री. शिवाजी राऊत यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही “मी स्वतः येऊन पाहतो” या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रमुख श्री. रामसे हे तर संपर्काबाहेरच असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील दुर्गम आणि वर्दळ नसलेल्या भागांमध्ये अशाच प्रकारे फलक लावून लाखोंची कामे दाखवली जात असल्याची गंभीर चर्चा आता रंगू लागली आहे. राहू बेटातील पाणवली परिसरात यापूर्वीही अशाच तक्रारी झाल्या, मात्र त्या दाबून टाकल्याचा आरोप आहे.

दोन पंचायत समित्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत अनेक रस्त्यांची कामे दाखवून दहा-दहा लाखांच्या खर्चाचे बिल काढले गेले, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय किंवा पूर्णपणे अस्तित्वात नसल्याचे समोर येत आहे.

या सर्व प्रकारामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमताचा संशय अधिकच गडद झाला आहे. सरकारी पगार घेणारे अधिकारी प्रत्यक्षात कोणाच्या ‘खाजगी सेवेत’ काम करत आहेत का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.

तालुक्यातील नागरिकांकडून आता एकमुखी मागणी होत आहे की —
गेल्या दोन वर्षांतील सर्व रस्ते व विकास कामांची स्वतंत्र आणि प्रामाणिक चौकशी करण्यात यावी

दौंड तालुक्यातील विकासकामांचा हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेत रुजलेल्या भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचे दिसत आहे. जर तात्काळ चौकशी झाली नाही, तर “रस्ता नाही… पण बिल आहे” हा प्रकार पुढेही सुरू राहण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.