हिंगणी गाडा: शेततळे की दगडखान? मुरूम-दगड गायब… चोरीचा गुन्हा कोणावर? ग्रामस्थांचा संताप उफाळला


आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण विशेष वृत्त

दौंड तालुक्यातील हिंगणी गाडा येथे शेततळ्याच्या नावाखाली सुरू असलेला संशयास्पद प्रकार आता गंभीर टप्प्यावर पोहोचला असून गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. शेततळ्यातून खोदून काढलेला मुरूम आणि दगड जागेवर नसल्याने ही सरळसरळ चोरी नाही का? असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
शासनाच्या परवानगीचा आधार घेऊन शेततळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन करून दगडखानीसारखे भगदाड निर्माण करण्यात आले. मग या उत्खननातून बाहेर काढलेला मुरूम-दगड नेमका गेला कुठे? त्याची विक्री झाली का? आणि जर झाली असेल, तर हा चोरटा तस्करीचा प्रकार नाही का? असा रोखठोक प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहेत.
यापूर्वीच या ठिकाणी सुरू असलेला प्रकार बंद करावा म्हणून ग्रामसभेने एकमुखाने ठराव मंजूर करून प्रशासनाला पाठवला होता. मात्र, त्या ठरावाची प्रशासनाने उघडपणे पायमल्ली केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. “जर ग्रामसभेच्या ठरावाला किंमत नसेल, तर ग्रामसभा घेण्याचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे शेततळे नसून प्रत्यक्षात दगडखानच आहे
दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग होत असून धुरळ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो
शेजारील वस्तीवरील लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे
अशा गंभीर तक्रारी असूनही संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देत एका कुटुंबावर खंडणी आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “शेततळ्याच्या नावाखाली झालेल्या गैरप्रकारातून लक्ष विचलित करण्यासाठीच हा गुन्हा दाखल करण्यात आला का?” अशी चर्चा गावात रंगली आहे.
सदर कुटुंबातील सर्व सदस्य सध्या फरार असून, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. चारा-पाणी आणि दूध काढण्याची व्यवस्था कोलमडल्याने मुक्या जनावरांचे हाल सुरू झाले आहेत, ही बाब अधिक गंभीर आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाची पार्श्वभूमी देशसेवेची असून, सैनिक परंपरा असलेल्या या कुटुंबावर अचानक खंडणी आणि चोरीसारखे आरोप लादले जाणे संशयास्पद असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांचा थेट आरोप आहे की हा गुन्हा राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आला
पोलिसांनी वस्तुनिष्ठ परिस्थितीची पडताळणी न करता कारवाई केली
“शेततळे आणि दगडखान” यातील मूलभूत फरकही दुर्लक्षित केला गेला
आता गावकऱ्यांची ठाम मागणी आहे की,
शेततळ्यातून काढलेल्या मुरूम-दगडाच्या तस्करी बाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
हिंगणी गाडा प्रकरण आता केवळ शेततळ्या पुरते मर्यादित राहिले नसून, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राजकीय हस्तक्षेप यांच्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरत आहे