आवाज लोकशाहीचा | विशेष वृत्त
विजय चव्हाण
पुणे–सोलापूर महामार्गावर सध्या फायबर केबल आणि गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या कामाच्या कार्यपद्धतीमुळे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांवरच यंत्रसामग्री उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे.
भांडगाव ते वाखारी दरम्यान तसेच जाऊ-जिबाऊची वाडी ते माकर वस्ती या भागात सेवा रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याची परिस्थिती आहे. जेसीबी, ट्रक आणि इतर यंत्रांमुळे मार्ग अरुंद झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत की, काही ठिकाणी ठेकेदार आणि सब-ठेकेदारांनी दादागिरी करण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवले आहे. नागरिकांनी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे, आरेरावीची भाषा आणि उलट ११२ वर तक्रारी करण्याचे प्रकार समोर येत आहेत.
कामासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, याबाबत स्पष्टता नाही. इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रे दाखवून “परवानगी घेतली आहे” असा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांना त्याची खातरजमा करता येत नाही. त्यामुळे इंग्रजी अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात असल्याची भावना नागरिकांत आहे.
गॅस पाईपलाईनसारख्या संवेदनशील प्रकल्पासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप आहे. भविष्यात गॅस गळतीसारखा प्रकार घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. भोपाळ वायू दुर्घटना यासारखी घटना लक्षात घेता प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “न्याय कुणाकडे मागायचा?” असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मागण्या स्पष्ट:
संबंधित कामांची परवानगी आणि कागदपत्रे सार्वजनिक करावीत
सेवा रस्ते त्वरित मोकळे करून वाहतूक सुरळीत करावी
दादागिरी करणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करावेत
गॅस पाईपलाईन कामासाठी सुरक्षा मानके जाहीर करावीत
या सर्व प्रकरणात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



