दौंडमध्ये ‘रस्ते उखडा आणि पुन्हा बांधा’चा खेळ? – कोट्यवधींच्या कामांवर संशयाची छाया


आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये कमिशनच्या स्पर्धेतून “रस्ते उखडा आणि पुन्हा बांधा” हा नवा उद्योग सुरू झाला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
पाटस येथील भागवत वस्ती ते चव्हाण वस्ती मार्गे होले वस्तीपर्यंत मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे एक  कोटी ७० लाख अधिक निधीतून डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आला होता. हे काम नागेश्वर कन्स्ट्रक्शन (प्रोप्रायटर – नागेश बोबडे) यांनी पूर्ण केले होते. नियमानुसार या रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर असताना, अजून एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच हा रस्ता उखडून टाकण्यात आला आहे. हे बोबडे यांनीच सांगितलेले आहे .
विशेष म्हणजे, होले वस्ती ते चव्हाण वस्ती दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटरचा चांगल्या स्थितीतील डांबरी रस्ता पूर्णपणे उध्वस्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते हा रस्ता अत्यंत चांगल्या अवस्थेत होता. मग असा रस्ता उखडण्यामागचा नेमका हेतू काय? हा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, याच परिसरात पुढे मोहिते वस्तीपर्यंत जवळपास एक कोटी रुपयांच्या नवीन रस्त्याचे काम ‘सूर्या कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदारामार्फत सुरू आहे. नवीन काम सुरू असतानाच जुन्या, चांगल्या स्थितीतील रस्त्याचे उखडकाम करण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंडचे शाखा अभियंता श्री. शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “पहावं लागेल” असे सांगून नंतर संपर्क टाळला. उपकार्यकारी अभियंता श्री. सोनवणे तसेच कार्यकारी अभियंता श्री. पवार यांनीही फोन न उचलता मौन बाळगले आहे. अधिकाऱ्यांची ही टाळाटाळ नागरिकांच्या शंकेला अधिक खतपाणी घालत आहे.
दुसरीकडे, संबंधित ठेकेदार नागेश बोबडे यांनी स्पष्ट केले की, “दुरुस्तीचा कालावधी अजून एक वर्ष शिल्लक आहे.” त्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर बनतो – देखभाल कालावधी सुरू असतानाच रस्ता उखडण्याचा आदेश कोणी दिला?
या घटनेमुळे आणखी एक मोठा मुद्दा पुढे आला आहे. सुरुवातीला सुमारे १.७० कोटी रुपयांचा रस्ता तयार केला, त्यातील काही भाग उखडला आणि आता त्याच मार्गावर पुन्हा जवळपास ९० लाख रुपयांचे नवीन काम सुरू आहे. म्हणजेच एकाच रस्त्यावर वारंवार कोट्यवधींचा खर्च – हा निव्वळ विकास की आर्थिक गैरव्यवहार?
यापूर्वीही राहू–पिंपळगाव–पारगाव–वाघोली या अष्टविनायक मार्गावरील सुमारे ६० कोटी रुपयांचा रस्ता उखडून त्यावर पुन्हा ४२५ कोटी रुपयांचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास २००कोटी खर्चूनही नागरिकांना पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे चांगले रस्ते मोडून पुन्हा तयार करण्याचा खेळ सुरू आहे.
या सर्व प्रकारामुळे बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर संशय व्यक्त केला जात असून, “विकासाच्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय?” असा संतप्त सवाल आता दौंडकर विचारू लागले आहेत.
जर ही बाब वेळेत स्पष्ट झाली नाही, तर हा विषय केवळ रस्त्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो थेट भ्रष्टाचाराच्या चौकशीपर्यंत जाऊ शकतो, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.