आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त: विजय चव्हाण..
बोरी पारधी येथे सर्व महामानवांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचा भव्य जागर; ऐतिहासिक सोहळ्याने दौंड तालुका दुमदुमला!
दौंड (बोरी पारधी):
“आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आणि आव्हानात्मक बनली आहे. माणसामाणसांत भेद निर्माण केला जात असून, जातीय तणावाचा हैदोस सुरू आहे. ज्या राज्यातून कधीकाळी सुख-शांतीची गंगा वाहत होती, तिथे आज अस्वस्थता पसरली आहे. अशा या वैचारिक अंधकारात आपल्याला केवळ आणि केवळ महामानवांचे विचारच तारू शकतात. म्हणूनच, समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारे ‘संयुक्त जयंती सोहळे’ गल्लीबोळांपासून ते दिल्लीपर्यंत होणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट आणि परखड मत युवराज छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील बोरी पारधी येथे गावातील सुजाण आणि एकत्र आलेल्या तरुण मंडळाच्या वतीने सर्व महामानवांच्या ‘संयुक्त जयंती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते.
हलगी-सनईचा गजर अन फटाक्यांची आतिषबाजी; शिवरायांच्या वंशजांचे शाही स्वागत!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारसा लाभलेले युवराज संभाजीराजे यांचे बोरी पारधी गावात आगमन होताच, अवघे गाव आनंदाने न्हाऊन निघाले. हलगी, सनई आणि चौघड्यांच्या पारंपरिक आणि अंगावर रोमांच उभे करणाऱ्या सुरांमध्ये तरुणांनी त्यांचे शाही स्वागत केले.
शाळेपासून ते थेट गावकऱ्यांच्या चावडीपर्यंत पायी चालत आले. हा अद्भूत सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी आणि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. फटाक्यांच्या दणकेबाज आतिषबाजीने अवघे आकाश उजळून निघाले होते. गावातील सर्व जाती-धर्माचे तरुण खांद्याला खांदा लावून या स्वागतात सहभागी झाले होते, जे पाहून ‘शिवशाही’ पुन्हा अवतरल्याचा भास होत होता.
व्यासपीठावरून जनसमुदायाला संबोधित करताना युवराज संभाजीराजे पुढे म्हणाले,
“सध्या राज्यामध्ये धर्म आणि जातीच्या नावावर वादविवादांचे पेव फुटले आहे. परिणामी, आपला महाराष्ट्र सध्या अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. ज्या महापुरुषांनी स्वतःचे रक्त सांडून, बलिदान देऊन आपल्याला ‘माणूसपण’ आणि ‘माणुसकी’ शिकवली, तीच माणुसकी आज हरवताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता अशा वैचारिक कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील की नाही, याबद्दल माझ्या मनात शंका होती. मात्र, बोरी पारधीच्या तरुणांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा जो विचारांचा महाकुंभ उभा केला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.”
हाच आदर्श घेऊन माजी आमदार रमेश थोरात यांनी दौंड तालुक्यातील प्रत्येक गावागावात अशा संयुक्त जयंत्यांचे आयोजन करावे, अशी जाहीर अपेक्षाही महाराजांनी यावेळी व्यक्त केली.
कलावंतांनी जिंकली मने; एकपात्री प्रयोगाला छत्रपतींची दाद!
या वैचारिक सोहळ्यात ‘नटसम्राट’ कुमार आहेर यांनी “मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय” आणि “संत गाडगेबाबा” हे एकपात्री प्रयोग सादर केले. त्यांच्या जिवंत आणि बहारदार अभिनयाने उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. छत्रपतींच्या थेट समोर असा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ असून, महाराजांनी स्वतः या प्रयोगाला भरभरून दाद दिली, असे भावुक समाधान कलाकार कुमार आहेर यांनी व्यक्त केले.
तसेच, रेल्वे युनियन (NRMU) चे पदाधिकारी अनिल धेंडे, अनिल ताडगे,’स्वर साधना’ संस्थेचे दादासाहेब सोडणार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला…” या भजनाचा असा काही गजर केला की, उपस्थित श्रोते भक्तीरसात डोलू लागले…आणि तरुणाईमध्ये संचारला नवा जोश!
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुणे समाज कल्याण विभागाचे आयुक्त विशाल लोंढे यांनी उपस्थिती लावली. उशिरा येऊनही त्यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या घणाघाती आणि ओघवत्या भाषणाने तरुणाईमध्ये एक नवा जोश भरला. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना जीवनात उभारी देण्यासाठी काय करावे, याबद्दल त्यांनी दिलेल्या ‘सक्सेस टिप्स’ पालकांच्या मनाला भिडल्या.
व्यासपीठावरील मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याचे कौतुक करताना माजी आमदार रमेश थोरात यांनी तरुण संयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी व्यासपीठावर:
रमेश थोरात (माजी आमदार, दौंड तालुका)
गायत्री खळदकर (जिल्हा परिषद सदस्या)
गणेश थोरात, सागर शेलार, साहेबराव पोळ
राहुल दिवेकर (संचालक, जिल्हा दूध संघ)
सागर फडके, नितीन दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यासोबतच श्रीगोंद्यावरून आलेले फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पुरस्कर्ते ॲड. संभाजी बोर्डे, मुकुंद सोनटक्के, भीमराव कोथिंबीर, ॲड शिंदे, तसेच भिगवणहून आलेले ॲड. पांडुरंग जगताप, ज्येष्ठ पत्रकार भरत मल्लाव आणि त्यांचे सहकारी विशेषत्वाने उपस्थित होते. उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट आणि समाधान
जवळपास साडेतीन तास चाललेला हा वैचारिक सोहळा गावकऱ्यांनी कमालीच्या शांततेत आणि शिस्तीत ऐकला. कार्यक्रमाचा समारोप करताना युवराज संभाजीराजे म्हणाले, “मी शाहू-शिवाजींचा वारसदार या नात्याने या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि सर्व तरुण मंडळाचे जाहीर आभार मानतो.” महाराजांच्या या शब्दांनी संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी गुंजून उठला.
विशेष वैशिष्ट्य: या कार्यक्रमाचे कोणतेही एक वैयक्तिक अध्यक्ष नव्हते. गावातील ‘सर्व समवेत तरुण मंडळ’ हेच याचे सर्वेसर्वा होते. प्रत्येक तरुण हा पदाधिकारी म्हणून राबत होता, हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले. बोरी पारधी गावाला प्रथमच असा ऐतिहासिक वैचारिक लाभ मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.



