दिव्यांगांना दिलेला शब्द दौंड चे महसूल नायब तहसीलदार डॉक्टर तुषार बोरकर यांनी पाळला, दिव्यांगाची रखडलेली पेन्शन खात्यात जमा, ..रामेश्वर मंत्री…

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड तालुक्यातील दिव्यांगांच्या रखडलेल्या पेन्शनप्रश्नी अखेर सकारात्मक तोडगा निघाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनच्या वतीने आज (१५ मे) दौंड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
प्रहार पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात येणार होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिव्यांगांची पेन्शन रखडलेली होती. प्रमाणपत्र पडताळणीच्या नावाखाली काही बोगस प्रकरणांमुळे खरी गरज असलेल्या दिव्यांगांना पेन्शन देण्यात विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
सर्व दिव्यांगांनी एकत्र येत तहसीलदारांना जाब विचारण्यासाठी ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दौंड तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार आणि नगराध्यक्ष उषादेवी जगदाळे यांच्या निधनामुळे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले. त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान, महसूल नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांनी दिव्यांग प्रतिनिधींशी चर्चा करत दोन ते तीन दिवसांत पेन्शन खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार आज अनेक दिव्यांगांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी दिव्यांग बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच आंदोलन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या भाऊसाहेब जराड, भाऊसाहेब वाघमारे यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक जालिंदर दिवेकर, तालुकाध्यक्ष राजा मुलानी, अनिल भालेराव, तात्या भोसले, श्रीपाद शिंदे, अनिल शिंदे, सुवर्णा सोनवणे, अरुण सोनवणे, आबा जगताप, राजाराम बारवकर आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग व महिला उपस्थित होत्या.
दिव्यांगांच्या हक्कासाठी उभारलेला हा लढा अखेर यशस्वी ठरल्याचे चित्र असून प्रशासनाने तत्काळ कारवाई केल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.