| विजय चव्हाण आवाज लोकशाहीचा
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलीस दलाची प्रतिमा दौंडमध्ये सध्या पुसट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत दौंड शहरात घडलेल्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला असून, पोलिसांची संशयास्पद भूमिका आणि राजकीय दबावामुळे सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडू लागला आहे.
विवेक गटने आत्महत्येने व्यवस्थेचे वाभाडे काढले
मुद्रांक विक्रेते विवेक गटने यांच्या आत्महत्येने दौंडमधील राजकीय आणि गुन्हेगारी साखळी उघड केली आहे. गटने यांनी मृत्यूपूर्वी १ ते १० जानेवारी दरम्यानची आपली कैफियत लिहून ठेवली होती. दोन वेळा माझ्या जीविताला धोका असल्याने सत्यप्रतिज्ञापत्र केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या मजकुरात आढळून येत आहे हे व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे.
आपल्या पत्रात एका आमदारासह प्रेम कटारिया यांच्या नावाचा उल्लेख करत “माझ्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका” अशी आर्त हाक दिली आहे.
हा स्थानिक पोलिसांच्या तपासावर संशय असल्याने, तपास परजिल्ह्यातील यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी जोर धरत आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काळा डाग लावणारे ठरले आहे. दौंडमधील दोन पोलीस ठाण्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला, हे संतापजनक आहे. अखेर पीडितेला अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन न्याय मागावा लागला. या प्रकरणात पोलिसांची गुन्हेगारांशी झालेली कथित ‘गोपनीय बैठक’ खाकीची अब्रू वेशीवर टांगणारी आहे.
व्यापारी विशाल धुमावत यांच्या संदर्भातील सावकारी प्रकरण असो किंवा नकली नोटांचा व्यवहार, प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे.
तपासाऐवजी “अर्थपूर्ण तडजोड” करण्याकडे पोलिसांचा कल असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत.
विशिष्ट गुन्हेगारी टोळ्यांना मिळणारे अभय शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत आहे.
राजकीय दबावापोटी वर्दीची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
पीडित महिलेला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गुन्हा दाखल करावा लागतो, ही दौंड पोलिसांसाठी शरमेची बाब नाही का?
“कायद्याचे राज्य की गुंडांचे? हा प्रश्न आज प्रत्येक दौंडकर विचारत आहे. जर रक्षकच भक्षक बनू पाहणाऱ्यांना साथ देत असतील, तर जनतेने जायचे कुठे? राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावे की, सत्ता येते आणि जाते, पण लोकांचा शाप आणि विस्कळीत झालेली कायदा-सुव्यवस्था पिढ्या उद्ध्वस्त करते.”
दौंडमधील या परिस्थितीवर आता वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. गटने आत्महत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास आणि दोषींना राजकीय पाठबळ देणाऱ्यांचा बुरखा फाडणे हाच दौंडकरांना दिलासा देण्याचा एकमेव मार्ग आहे. अन्यथा, पोलिसांवरील अविश्वास लोकशाहीसाठी घातक ठरेल.



