केंद्रावरील धक्कादायक प्रकार | ग्रामीण तरुणांच्या कष्टाची थट्टा | ‘त्या’ अदृश्य मास्टरमाईंडचा वरदहस्त कोणावर?
दौंड : विजय चव्हाण (आवाज लोकशाहीचा)
राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) भरती प्रक्रियेने आज पारदर्शकतेचा बुरखा फाडून फेकला आहे. इंदापूर येथे पार पडलेल्या गट क्रमांक ५ च्या लेखी परीक्षेत चक्क एका खाजगी प्रश्नसंचातून तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे विचारले गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा निव्वळ योगायोग नसून एका सुनियोजित ‘पेपर फोडा’ कटाचा भाग असल्याची चर्चा आता दौंडसह संपूर्ण राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
अभ्यास करायचा की पुस्तकं पाठ करायची?
ग्रामीण भागातील तरुण रक्ताचं पाणी करून, पहाटेच्या थंडीत मैदानावर घाम गाळून आणि रात्ररात्र जागून अभ्यास करून या भरतीकडे आशेने पाहत होते. मात्र, प्रश्नपत्रिका हातात पडताच अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले. एकाच विशिष्ट खाजगी पुस्तकातील प्रश्न क्रमांक बदलून छापले गेले होते. यामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांच्या कष्टावर पाणी फिरले असून, ज्यांच्याकडे ते ठराविक पुस्तक होते, त्यांचे ‘चांगभलं’ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही प्रशासनाची अक्षम्य चूक आहे की विशिष्ट वर्गाला फायदा पोहोचवण्यासाठी केलेली ‘सेटिंग’, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
राजकीय आशीर्वादाने ‘खेळ’ मांडणारा तो अधिकारी कोण?
या संपूर्ण प्रकरणामागे एका ‘मास्टरमाईंड’ची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनातील एक बडा अधिकारी राजकीय छत्रछायेखाली हा सर्व खेळ रचत आहे. सरकारी पगारावर डल्ला मारायचा आणि काम मात्र खाजगी नोकरासारखे ठराविक लोकांच्या हितासाठी करायचे, असा हा धक्कादायक प्रकार आहे. या अधिकाऱ्याला कुणाचे अभय लाभले आहे? तो कोणाच्या तालावर नाचतोय? हे प्रश्न आता जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?
प्रकरण सोशल मीडियावर तापल्यानंतर प्रशासनाने घाईघाईत परीक्षा स्थगित केली असून चौकशी समिती नेमली आहे. मात्र, अशा समित्या म्हणजे केवळ वेळकाढूपणा आणि मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचे प्रयत्न तर नाहीत ना? असा संशय उमेदवारांना वाटत आहे. केवळ परीक्षा रद्द करून प्रश्न सुटणार नाही, तर या घोटाळ्याचे मुळ शोधून त्या ‘अदृश्य शक्ती’ला बेड्या ठोकण्याची गरज आहे.
ही निव्वळ तांत्रिक चूक नाही, तर हजारो गरिबांच्या मुलांच्या भविष्याशी खेळलेला हा खेळ आहे. ८५ प्रश्न एकाच पुस्तकातून येतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे पचनी पडण्यासारखे नाही. ही यंत्रणा चालते कशी आणि कोणासाठी? जर आताच कडक कारवाई झाली नाही, तर भरती प्रक्रियेवरचा सामान्य जनतेचा विश्वास कायमचा उडेल.
ग्रुप ५ चा समादेशक सहाय्यक सचिन डहाळे.या प्रकरणात फोन उचलत नाहीत त्यांना अनेक वेळा फोन केला आहे सदर अधिकारी फोन घेत नसल्याने त्यांच्या विषयी भुवया उंचावलेला आहे.



