माफीनाम्याच्या सुरुळीत गुंडाळली का बुद्धांची विटंबना?” — दौंडमध्ये संताप, प्रश्न अनुत्तरित

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी घडलेली घटना आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. Gautama Buddha यांच्या प्रतिमे समोर करण्यात आलेल्या कृत्याबाबत सुरुवातीला तीव्र संताप व्यक्त करणारेच आता शांत का झाले, हा प्रश्न शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
घटनेनंतर सुरुवातीला आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणाऱ्या काही अनुयायांनी “आम्हाला अटक करा, अन्यथा आयोजकांवर कारवाई करा” असा थेट इशारा पोलिसांना दिला होता. मात्र काही दिवसांतच हा संताप ओसरला आणि प्रकरण एका साध्या कागदी माफी नाम्यावर येऊन थांबले, अशी तीव्र टीका होत आहे.
पोलिस प्रशासनानेही सुरुवातीला “अभ्यास करून पुढील कारवाई करू” असे सांगत वेळ घेतली. पण माफीनाम्यानंतर अधिकाऱ्यांची भूमिका कमालीची मवाळ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे “कायद्याचा वापर समान आहे का?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
याच घटनेच्या संदर्भात एक मोठा मुद्दा पुढे येतो —
जर उलट परिस्थिती असती आणि बौद्ध अनुया.यांकडून इतर धर्मीयांच्या दैवतांची विटंबना झाली असती, तर पोलिसांची प्रतिक्रिया इतकीच शांत राहिली असती का? की तत्काळ गुन्हे दाखल होऊन अटकसत्र सुरू झाले असते?
दौंड मधील सामाजिक वास्तवही या निमित्ताने उघड झाले आहे. संख्येने मोठा असलेला बौद्ध समाज मात्र संघटित आणि ठाम भूमिका घेण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. ख्रिस्ती समाजाने चर्च उभे केले, मुस्लिम समाजाने मशिदींना प्राधान्य दिले, मात्र बौद्ध समाज अजूनही मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेताना दिसत नाही, असा सूर उमटतो आहे.
या सर्व वादाच्या केंद्रस्थानी आहे — बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कालीचरण नावाच्या हिंदू प्रवक्त्यां कडून बुद्धांच्या प्रतिमे समोर करण्यात आलेली आरती. या कार्यक्रमाला काही बौद्ध अनुयायीही उपस्थित होते, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
घटनेनंतरचा संपूर्ण वाद एका माफीनाम्याच्या “सुरुळीत” गुंडाळून टाकण्यात आला, आणि त्यामुळे आंदोलनाची धारच बोथट झाली, असा आरोप होत आहे.

ही घटना खरंच इतकी किरकोळ होती का की माफीनाम्यावर संपवावी?
सुरुवातीला आक्रमक असलेले आवाज अचानक शांत का झाले?
पोलिस प्रशासनाची भूमिका इतकी मवाळ का झाली?
आणि सर्वात महत्त्वाचे — दौंडमध्ये खऱ्या अर्थाने “भीम अनुयायी” जागे आहेत का?
दौंड शहरात सध्या शब्दांचा आक्रोश आहे, पण कृतीत मात्र शांतता. ही शांतता विचार करायला भाग पाडणारी आहे.