४४वर्षांनी जुन्या शाळेला नतमस्तक होऊन तत्कालीन गुरुजनांचा सन्मानाचे कौतूक करीत आशीर्वाद घेणाऱ्या आजच्या साठी कडे झुकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यकाम दौंड तालुक्यातील पडवी येथे
संपन्न झाला.

आवाज.लोकशाहीचा विजय चव्हाण

पडवी (ता. दौंड) : काळ पुढे सरकला, शिक्षणाचे दिवस मागे पडले, संसाराच्या जबाबदाऱ्यांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटांवर नेले; कोण नोकरीत रमले, कोण व्यवसायात स्थिरावले, तर कोण देशसेवेसाठी सीमेवर उभे राहिले. मात्र शाळेच्या बाकावर निर्माण झालेली मैत्री आणि बालपणीच्या आठवणींचे नाते काळाच्या ओघातही कायम राहते, याचा प्रत्यय पडवी येथील श्रीराम विद्यालयात तब्बल ४१ वर्षांनंतर भरलेल्या १९८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनातून आला.

सन १९८५ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण करून आपापल्या जीवनप्रवासाला सुरुवात केलेले विद्यार्थी २०२६ मध्ये पुन्हा एकदा त्याच शालेय नात्याने एकत्र आले. आज अनेक जण साठीच्या उंबरठ्यावर किंवा साठ वर्षांहून अधिक वयाचे झाले आहेत. डोक्यावरील काळेभोर केस पांढरे झाले, चेहऱ्यावर अनुभवांच्या सुरकुत्या उमटल्या, संसाराची जबाबदारी पार पडली, मुलांचे संसार उभे राहिले, तर काहींच्या आयुष्यात नातवंडांचे आगमनही झाले. मात्र एकमेकांना भेटताच वयाचे सर्व अंतर दूर झाले आणि पुन्हा एकदा शाळकरी दिवस जिवंत झाले.

या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक दिवस एकत्र येणे नव्हे, तर तब्बल तीन वर्षांच्या प्रयत्नांतून विखुरलेल्या वर्गमित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याची जिद्द. त्याकाळचे शिक्षक, नोकरी-व्यवसायानिमित्त दूर गेलेले मित्र आणि लग्नानंतर माहेरी गेलेल्या मैत्रिणी यांचा संपर्क साधणे हे मोठे आव्हान होते. मात्र आयोजकांनी सातत्याने प्रयत्न करून या आठवणींच्या सोहळ्याला मूर्त स्वरूप दिले.

या आगळ्यावेगळ्या स्वागतासाठी श्रीराम विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. लेझीम पथकाच्या तालावर माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्यावर सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून नव्या पिढीने जुन्या पिढीचे केलेले स्वागत उपस्थितांच्या मनाला भावले. सर्वांनी एकाच रंगाचे गुलाबी फेटे परिधान केल्यामुळे स्नेहमेळाव्याला आगळेच रूप प्राप्त झाले होते.

जुन्या शाळेच्या भूमीला नतमस्तक होऊन वंदन केल्यानंतर नव्याने उभारलेल्या सुंदर विद्यालयाच्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्या शाळेने आयुष्याला दिशा दिली, ज्या गुरुजनांनी अक्षरांची ओळख करून दिली आणि जीवनाचे संस्कार दिले, त्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा भावनिक क्षण यावेळी अनुभवायला मिळाला.

एकमेकांची आपुलकीने विचारपूस करताना मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, निवृत्ती, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नातवंडांपर्यंतच्या प्रवासाची माहिती घेतली जात होती. कधीकाळी वर्गात दंगा-मस्ती करणारे विद्यार्थी आज आयुष्याच्या अनुभवांनी समृद्ध झाले असले, तरी मित्रांसमोर आल्यावर त्यांच्यातील तोच खट्याळ शाळकरी मुलगा पुन्हा जागा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वयाची साठी ओलांडण्याच्या टप्प्यावर असतानाही मैत्रीचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद तरुणाईची आठवण करून देणारा होता.

या स्नेहसंमेलनात निवृत्त सैनिक मधुकर बारवकर यांनी व्यक्त केलेले विचार उपस्थितांच्या मनाला विशेष भावले. १९८५ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण करून देशसेवेच्या प्रवासाला निघालेल्या बारवकर यांनी भारतीय सैनिक म्हणून अनेक वर्षे देशाची सेवा केली आणि निवृत्तीनंतर पुन्हा आपल्या जुन्या मित्रांमध्ये सहभागी झाले.

ते म्हणाले की, आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, ते प्रत्येकाच्या आयुष्यातील खडतर परिश्रमांचे प्रतीक आहे. हा केवळ भाषणाचा किंवा जुन्या आठवणी सांगण्याचा कार्यक्रम नसून आपल्या गावाचे आणि समाजाचे ऋण व्यक्त करण्याची संधी आहे.

यावेळी त्यांनी उपस्थित प्रत्येक मित्राने आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. आज आपण त्या झाडाची सावली अनुभवू किंवा नाही, मात्र भविष्यात आपल्या मुलांना, नातवंडांना आणि पुढील पिढ्यांना त्या झाडाची सावली व फळे नक्कीच मिळतील, असे त्यांनी सांगितले.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारांचा आधार घेत त्यांनी प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, अशी भावना व्यक्त केली.

१९८५ ते २०२६ या ४१ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात प्रत्येकाने आपल्या परीने आयुष्याची लढाई लढली. कुणी नोकरीतून निवृत्त झाले, कुणी व्यवसायात स्थिरावले, तर कुणी सामाजिक जीवनात योगदान दिले. काहींनी देशसेवेचा मान मिळवला. मात्र या सर्वांच्या आयुष्यातील एक समान धागा म्हणजे श्रीराम विद्यालयातील विद्यार्थी म्हणून घालवलेले ते दिवस!

आजच्या मुलांना आणि गावकऱ्यांना आपल्या या एकत्र येण्याचा अभिमान वाटावा, आपल्या मैत्रीचे कौतुक व्हावे आणि पुढील पिढीनेही अशाच प्रकारे नाती जपावीत, हीच या स्नेहसंमेलना मागील भावना असल्याचे उपस्थितांच्या वागण्यातून जाणवत होते.

शालेय जीवनातील आठवणी, गुरुजनांप्रती कृतज्ञता, मित्र-मैत्रिणींचे प्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना यांचा सुंदर संगम या स्नेहसंमेलनात पाहायला मिळाला.

शाळा संपली, शिक्षण संपले, नोकऱ्या संपल्या, संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडल्या; पण मैत्रीचा वर्ग अजूनही सुरूच आहे. काळाने केस पांढरे केले, वय वाढवले, मात्र मनातील शाळकरी दिवस तसेच जिवंत ठेवले.

हा स्नेहमेळावा केवळ जुन्या आठवणींचा सोहळा ठरला नाही, तर गुरुजनांचा सन्मान, गावाप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम ठरला.कार्यक्रमासाठी.विशेष प्रयत्न कालिदास कुतवळ (सर)कामठे मेमाणे मॅडम, श्री शिंदे, श्री कोळी, श्री भिसे सर ,उज्वला शितोळे मॅडम, ज्ञानदेव पंडित सर अशोक बारवकर सर उत्तम कुंभार सर मधुकर बारवकर सेवानिवृत्त फौजी रवींद्र खंडागळे रामदास शितोळे दिलीप बारवकर रामदास डेबळकर यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेसाठी २५ हजार रुपयांची मदत चंद्रकांत सोनवणे यांनी दिली तसेच वस्तुरूपी भेट देण्यात आली

रांगोळी
पडवी येथे १९८५ मधील इयत्ता दहावीचा वर्ग