आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
दौंडच्या पश्चिम पट्ट्यात खळबळ; कथित गैरवर्तनाच्या चर्चेला राजकीय दबावाची किनार? निष्पक्ष चौकशीची ग्रामस्थांची मागणी
दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या गावातील शैक्षणिक संस्थेबाबत समोर आलेल्या कथित गैरवर्तनाच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीने स्वतः पुढे येत संबंधित प्रकाराबाबत तक्रार केल्याची चर्चा असून, या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील पवित्र नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षण देणाऱ्या हातांकडूनच विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर शिक्षण व्यवस्थेने नेमके कोणाकडे पाहायचे? हा प्रश्न आता पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणातील चर्चेला आणखी एक वेगळी किनार लाभली आहे. परिसरात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की, प्रकरणाची व्याप्ती वाढू नये आणि संस्थेची बदनामी होऊ नये यासाठी काही प्रभावशाली मंडळींची धावपळ सुरू आहे. मात्र या राजकीय हस्त क्षेपाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, त्याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणात काही नावां भोवती फिरणारी सांकेतिक चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे. एका बाजूला घडलेल्या.घटनेवर’प्रकाश’ टाकला जावा आणि हा शिक्षक कोण हा प्रश्न उपस्थित होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातील ‘किरण’ नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
मात्र या प्रकरणी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत चौकशी आणि पुराव्यांची पडताळणी होणे गरजेचे आहे. व्यक्ती कोणतीही असो, राजकीय वजन कितीही मोठे असो, विद्यार्थिनीच्या सुरक्षितते पेक्षा कोणाचीही प्रतिष्ठा मोठी असू शकत नाही.
केवळ एक घटना की आणखी काही तक्रारी?
या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित संस्थेत यापूर्वीही अशा स्वरूपाच्या तक्रारी झाल्या आहेत का? इतर विद्यार्थिनीं नाही काही अनुचित अनुभव आले आहेत का? संस्थेने तक्रारींची नोंद ठेवली आहे का?
केडगाव बाजारपेठेसह पश्चिम पट्ट्यातील विविध गावांमध्ये या विषयाची चर्चा पोहोचल्याचे बोलले जात आहे. हॉटेल, पानटपऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेली कुजबुज थांबवायची असेल, तर प्रशासनाने सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
संस्थेची बदनामी मोठी की विद्यार्थिनीचे भविष्य?
शैक्षणिक संस्थेची प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे आहे; मात्र ती प्रतिष्ठा विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या किंमतीवर जपली जाऊ शकत नाही. तक्रार खरी असल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आरोप निराधार असल्यास संबंधितांनाही न्याय मिळाला पाहिजे.
विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवून तिचे म्हणणे महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संवेदनशीलपणे नोंदवावे. संबंधित संस्थेतील तक्रार निवारण यंत्रणा, महिला समिती आणि आवश्यकतेनुसार महिला बालकल्याण यंत्रणेकडे याचे लक्ष वेधावे
यवत पोलिसांनी या प्रकरणाची केवळ चर्चेपुरती दखल न घेता उपलब्ध माहितीची स्वतंत्र पडताळणी करावी. आवश्यक असल्यास संबंधित विद्यार्थिनी व पालकांचे जबाब नोंदवावेत, संस्थेतील नोंदी तपासाव्यात आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कारवाई करावी.
कायद्यापुढे कोणताही ‘किरण’ प्रभावशाली नसतो आणि सत्याचा ‘प्रकाश’ कोणत्याही दबावाने कायमचा झाकता येत नाही!
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा राजकीय प्रतिष्ठेचा किंवा संस्थेच्या प्रतिमेचा विषय नसून सामाजिक जबाबदारीचा विषय आहे. सध्या या शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवून त्या जागी एका महिला शिक्षकाला तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक करून कथित शिक्षकाला असलेल्या पगारातील काही रक्कम सध्या नेमलेल्या महिलेला देऊ केल्याचे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे
आता प्रश्न एकच — शिक्षणाच्या मंदिरातील सत्य बाहेर येणार की राजकीय प्रभावाच्या सावलीत हा विषय दडपला जाणार?
दौंड तालुक्यातील पालक आणि ग्रामस्थांना या प्रश्नाचे उत्तर निष्पक्ष चौकशीतून मिळण्याची अपेक्षा आहे.
—



