सोनवडी आरोग्य उपकेंद्राच्या श्रेय वादाचा उद्रेक; इमारत एक आणि फलक दोन!


आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…

सोनवडी गावातील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम सुरू होताच गावात विकासापेक्षा श्रेय वादाचीच चर्चा रंगली आहे. निधी कोणाचा, पाठपुरावा कुणाचा आणि इमारत नेमकी कोणामुळे उभी राहत आहे याचा जाहीर पंचनामा जणू एकाच कामाच्या ठिकाणी लागलेल्या दोन वेगवेगळ्या फलकांनी करून दाखवला आहे.


कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध कारणे पुढे करत या कामाला विरोध झाल्याची चर्चा गावात होती. कधी जागेचा प्रश्न, कधी पूररेषेचा मुद्दा तर कधी नकाशातील त्रुटी यावरून आक्षेप घेण्यात आले. मात्र प्रशासनाची मंजुरी, उपलब्ध करून देण्यात आलेली जागा आणि मंजूर निधी यामुळे अखेर या कामाचा मार्ग मोकळा झाला.


कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध कारणे पुढे करत या कामाला विरोध झाल्याची चर्चा गावात होती. कधी जागेचा प्रश्न, कधी पूररेषेचा मुद्दा तर कधी नकाशातील त्रुटी यावरून आक्षेप घेण्यात आले. मात्र प्रशासनाची मंजुरी, उपलब्ध करून देण्यात आलेली जागा आणि मंजूर निधी यामुळे अखेर या कामाचा मार्ग मोकळा झाला.


कामाला गती मिळाल्यानंतर मात्र विकासाच्या विटांपेक्षा श्रेयाच्या फलकांची उभारणी अधिक वेगाने झाल्याचे चित्र दिसून आले. एका बाजूला काही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेतृत्वाशी निष्ठा दर्शविणारा फलक झळकला, तर दुसऱ्या बाजूला या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करणाऱ्या माजी सरपंच अमोल पवार यांच्या वतीने दुसरा फलक उभारण्यात आला. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या श्रेय वादाचा गावात एकप्रकारे चर्चेचा धुमाकुळ सुरू झालेला आहे.


दौंड तालुक्यात विकासकामांच्या फलकांवर नेत्यांची नावे मोठ्या अक्षरात झळकतात; मात्र कामाचा तपशील, निधीचा स्रोत, कामाची मुदत, गुणवत्ता नियंत्रण, संबंधित विभाग आणि ठेकेदाराची माहिती अनेकदा शोधूनही सापडत नाही. नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये माहितीचा अधिकार फलकावर दिसायला हवा, पण प्रत्यक्षात दिसते ती केवळ राजकीय उपस्थिती.


विकासकामांच्या नावावर श्रेयाची स्पर्धा सुरू असताना कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र फार कमी चर्चा होताना दिसते. फलक लावण्याची घाई दिसते, पण कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि जनतेला मिळणारा प्रत्यक्ष लाभ याबाबतची जबाबदारी स्वीकारताना अनेकांचे हात मागे जातात, अशी नागरिकांची भावना आहे.


जनतेला आता उद्घाटक कोण आणि श्रेय कुणाचे यापेक्षा काम दर्जेदार झाले का, वेळेत पूर्ण झाले का आणि त्याचा लाभ नागरिकांना झाला का हे महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फलकांच्या राजकारणातून बाहेर पडून गुणवत्तेच्या राजकारणाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे.


सोनवडीच्या आरोग्य उपकेंद्राच्या निमित्ताने एक प्रश्न मात्र पुन्हा समोर आला आहे — विकासकामांचे खरे श्रेय फलकांवर दिसणाऱ्यांचे असते की कररूपाने पैसा भरणाऱ्या सामान्य नागरिकांचे?