आवाज लोकशाहीचा..
विजय चव्हाण…
जगद्गुगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी म्हणजे भक्ती, समता आणि वारकरी परंपरेचा चालता-बोलता उत्सव. वर्षातून एकदा दौंड तालुक्याला लाभणारा हा सोहळा हजारो भाविकांसाठी श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि अध्यात्मिक समाधानाचा क्षण ठरतो. मात्र यंदाच्या वारीने भक्तीबरोबरच एका वेगळ्याच चर्चेला उधाण आणले आहे. तालुक्यात चर्चा रंगली ती तुकोबांच्या वारीची कमी आणि दोन लोकनाट्य कला केंद्रांच्या बारीची अधिक.
“वारी तुकोबांची आणि करमणूक तमाशा बारीची” ही परंपरा परिसरात नवीन नाही. अनेक वर्षांपासून न्यू अंबिका लोकनाट्य कला केंद्र वैष्णवांच्या स्वागतासाठी आणि करमणुकीसाठी पुढाकार घेत आले आहे. मात्र यंदा रेणुका कला केंद्राने मोठ्या दिमाखात मैदानात उतरत जणू काही या परंपरेत आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला. उघड्यावर भव्य स्टेज, कलाकारांची उपस्थिती आणि वैष्णवांसाठी केलेली व्यवस्था यामुळे रेणुका कला केंद्राने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दौंड तालुक्यातील dhaygudewaadi, वाखारी आणि परिसरात अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरात तीन लोकनाट्य कला केंद्रांचे अस्तित्व आहे. ढोलकीचा ठेका, तुंतुण्याचे सूर आणि पेटीचा मंजुळ आवाज या भागासाठी नवीन नाही. मात्र या कलेची कीर्ती जितकी दूरवर पोहोचली, तितकीच वाद आणि चर्चांची सावलीही या केंद्रांवर पडत आली आहे.
पालखीचे हवेली तालुक्यातून दौंडमध्ये आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा पार पडला. सहजपूर, माकर वस्ती, थोरात वस्ती, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा मार्गे पालखी यवत येथे मुक्कामी दाखल झाली.
यवतमध्ये वैष्णव सेवेचे एक सुंदर चित्र पाहायला मिळाले. गावकऱ्यांनी घराघरातून भाकऱ्या दिल्या, सामुदायिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले आणि अबालवृद्धांसह मुस्लिम बांधवांनीही सेवाभावाने सहभाग नोंदवला. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः भाकरी थापून भाजत वैष्णव सेवेचा अनुभव घेतला आणि सेवाभावाचा संदेश दिला.
मात्र दुसऱ्या बाजूला चौफुला परिसरात एक वेगळीच रंगत सुरू होती. ढोलकीच्या तालावर आणि लावणीच्या ठेक्यावर कलाकारांनी रंगमंच गाजवला. काही काळासाठी का होईना, अभंगाच्या ओव्यांपासून रसिकांचे लक्ष लावणीच्या तालाकडे वळल्याचे चित्र दिसले. अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही या अनोख्या संगमाचे चित्र टिपण्यासाठी उपस्थित होते.
रेणुका कला केंद्राच्या सहभागामुळे पारंपरिक पद्धतीने ही सेवा जपणाऱ्या अंबिका लोकनाट्य कला केंद्रासमोर एक नवे आव्हान उभे राहिल्याची चर्चा यंदा सर्वत्र रंगली. लोककलेच्या या स्पर्धेत कोण जिंकले आणि कोण हरले यापेक्षा वैष्णवांच्या करमणुकीसाठी दोन्ही केंद्रांनी केलेला प्रयत्न चर्चेचा विषय ठरला.
कला ही कुणाची मक्तेदारी नसते आणि कलाकाराला आपली कला सादर करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे एका कला केंद्राच्या परंपरेत दुसऱ्याने प्रवेश केला म्हणून वाद निर्माण होण्याचे कारण नसले, तरी या स्पर्धेमुळे लोकनाट्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
दोन दिवसांचा भक्तिमय मुक्काम संपवून तुकोबारायांची पालखी बारामती तालुक्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र दौंड तालुक्याच्या स्मरणात यंदाची वारी एका वेगळ्याच कारणासाठी राहणार आहे.
कारण यंदा प्रश्न एकच होता —
अभंगाची वारी लावणीच्या दारी गेली होती की लावणीने अभंगाच्या वारीत आपले स्थान निर्माण केले होते?
उत्तर काहीही असो, पण तुकोबांच्या वारीसोबत दोन लोकनाट्य कला केंद्रांच्या बारीने यंदा दौंड तालुक्याच्या चर्चांना नवा विषय दिला, हे मात्र निर्विवाद आहे.



