आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दारूने भरलेला पिकअप टायर फुटून पलटी; पुणे-सोलापूर महामार्गावर तळीरामांची एकच धावपळ
पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड गावाजवळील उड्डाणपुलावर दारूची वाहतूक करणारा पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी सुमारे पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर जखमींना मदत करण्यापेक्षा काही जणांनी दारूच्या बाटल्या आणि बॉक्स सुरक्षित करण्यासाठीच अधिक धावपळ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१२-यूएम-९०७६ क्रमांकाचा हा पिकअप हवेली तालुक्यातील वडकी गावातील असल्याचे समजते. वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक सुरू असताना वरवंड उड्डाणपुलावर टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यावर पलटी झाला.
अपघातानंतर काही क्षणातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पलटी झालेल्या वाहनातील बॉक्स फुटून अनेक दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. याचाच फायदा घेत काही तळीरामांनी संधी साधत बाटल्या आणि बॉक्स घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती.
अपघातामुळे पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गर्दी आणि गोंधळामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.
या वाहनामध्ये दोन व्यक्ती प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सुदैवाने दोघांनाही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र पलटी झालेल्या वाहनातील अनेक बाटल्या फुटल्याने परिसरात दारूचा तीव्र वास दरवळत होता.
अपघातानंतर काही जणांनी मदतीचा हात पुढे केला, तर काहींनी मात्र विखुरलेल्या दारूच्या बाटल्यांकडे धाव घेतल्याचे चित्र पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. घटनास्थळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही तळीरामांच्या “मोफत मेजवानी”च्या अपेक्षांवरही पाणी फिरल्याची उपरोधिक चर्चा परिसरात रंगली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.



