आरोग्यदूताचा तालुका की गर्भलिंग रॅकेटचा? केडगाव प्रकरणामुळे दौंडच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह

आवाज लोकशाहीचा | विशेष लेख
दौंड | प्रतिनिधी : विजय चव्हाण
केडगाव येथील कथित गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे अधिक व्यापक असल्याचे समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ११ आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून, तपास सुरू असल्याने आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रकरणात सुरुवातीला मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्यासह डॉ. अतुल जाधव, डॉ. मंदार माळी, डॉ. सुंदरम कदम, डॉ. ठाकरे, डॉ. संगीता गायकवाड, मदतनीस सदिच्छा शिंदे, वाहनचालक अमित टेंगले आणि एजंट सचिन कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सुमंत तुकाराम शितोळे आणि बापूराव पंढरीनाथ जांबळे यांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात आरोग्य क्षेत्रात विविध विकासकामे झाल्याचा उल्लेख केला जातो. आमदार राहुल कुल यांना त्यांच्या काही समर्थकांनी “आरोग्यदूत” अशी उपाधी दिली आहे. मात्र, अशा पार्श्वभूमीवर तालुक्यात कथित गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपातासारखे गंभीर प्रकरण उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.
आरोग्य सुविधांचा विस्तार हा निश्चितच स्वागतार्ह विषय आहे. मात्र, त्याच आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर करून कायद्याने प्रतिबंधित आणि सामाजिकदृष्ट्या घृणास्पद कृत्ये होत असतील, तर ती संपूर्ण यंत्रणेसाठी आत्मपरीक्षणाची बाब ठरते.
या प्रकरणामुळे दौंड तालुक्याच्या प्रतिमेलाही धक्का बसला असून, ‘आरोग्यदूत’ म्हणून गौरव होत असलेल्या तालुक्यातच अशा प्रकारचे कथित रॅकेट कसे फोफावले? संबंधित यंत्रणांचे नियंत्रण आणि देखरेख कुठे कमी पडली? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे. मात्र, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या घोषणेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी केवळ योजना आणि गौरव पुरेसे नाहीत; तर आरोग्य व्यवस्थेवर कठोर देखरेख, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि दोषींवर कठोर कारवाईही तितकीच आवश्यक असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत आहे.
महत्वाचे: वरील बातमीतील आरोपींवरील आरोप हे पोलिस तपास आणि न्यायालयीन नोंदींवर आधारित आहेत. न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही दोषी मानले जाऊ शकत नाही.