पाटस गावात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघड
आवाज लोकशाहीचा
दौंड तालुका | प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. लिंबाला लवंग टोचून, त्यावर हळदी-कुंकू लावून आणि वहीच्या पानावर काही व्यक्तींची नावे लिहून हा साहित्याचा गठ्ठा रस्त्याच्या कडेला टाकलेला आढळला. या घटनेमुळे गावामध्ये विविध चर्चांना उधाण आले असून हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत शोध सुरू आहे.
गावाकडील भाषेत अशा कृतीला ‘कर्णी’, ‘भानामती’ किंवा ‘उतारा’ अशी नावे दिली जातात. विरोधकाला घाबरवणे, त्याच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्याचे नुकसान व्हावे अशी अपेक्षा ठेवून असा अघोरी प्रयोग केला जातो, अशी जनमान्यता आहे.
काही वर्षांपूर्वी भुताटकी आणि उताऱ्यांच्या नावाखाली चौकात, स्मशानपाशी किंवा निर्जन रस्त्यावर कोंबडा, अंडी, रोठ, टाचण्या, अर्धवट कापलेले लिंबू, बुक्का अशा साहित्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र लोकसंख्या वाढ, वर्दळीची ठिकाणे आणि पकडले जाण्याची भीती यामुळे असे प्रकार कमी झाले आहेत. तुळजापूर, काळूबाई परिसरातही अघोरी प्रथा देवस्थानांनी बंद केल्या आहेत.
शिक्षणाचा प्रसार, कायद्याची भीती आणि जनजागृतीमुळे अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असला तरी काही ठिकाणी असे प्रकार अद्याप सुरू असल्याचे वास्तव पाटस प्रकरणातून समोर आले आहे.
या अघोरी साहित्यावर ज्या व्यक्तींची नावे लिहिली होती, त्यांना मानसिक दबावाखाली ठेवणे आणि भीती दाखवणे हा यातला प्रमुख उद्देश असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु अशा भानामतीने एखाद्याचे नुकसान होते, संकटे टळतात किंवा शत्रू संपतो याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना अशा प्रकारातून घाबरू नये, तक्रार नोंदवावी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृतींना थारा देऊ नये, असे आवाहन केले आहे.



