आवाज लोकशाहीचा…विजय चव्हाण
दौंड नगरपालिकेत ‘फ्लेक्स’ प्रकरणातून शिकवण – बंधु भावच सर्वात मोठी ताकद**
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत फ्लेक्स फाडल्याच्या छोट्याशा घटनेने काही काळ वातावरण तापले… आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या… सोशल मीडियावर चर्चा पेटल्या. पण काही तासातच सत्य समोर आले आणि राजकारणाच्या धुरळ्यात लपलेल्या आपुलकीच्या आणि बंधु भावाच्या खुणा पुन्हा एकदा दिसू लागल्या.
रात्रीच्या अंधारात उमेदवाराचा फलक फाडल्याची बातमी समोर येताच कार्यकर्त्यांमध्ये क्षणभर तणावाचे वातावरण निर्माण झाले. सकाळ उजाडताच ही चर्चा गावोगाव पोहोचली. पोलिसात तक्रार, सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूज, विरोधी गटावर संशय… हा संपूर्ण खेळ एका तिढ्याकडे जाणारा वाटत होता.
मात्र काही तासांतच प्रकरणाची खरी गोष्ट उघडकीस आली— हे सर्व निवडणुकीतील गट राजकारण नव्हते, तर व्यसनाधीन तरुणाची भावनिक चूक होती. मोबाईलमधील संवादातून सर्व स्पष्ट झाले आणि काही क्षणातच तापलेले राजकारण थंडावले.
या घटनेतून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली— आपण एकमेकांचे शेजारी, नातेवाईक, सुखदु:खाचे सहप्रवासी, आणि गावाचे घटक आहोत. निवडणुका ही फक्त काही दिवसांची स्पर्धा; पण नाती कायमची.
शेजारी राहणारी, एकमेकांना मदत करणारी माणसं केवळ राजकीय गृहितकांमुळे एकमेकांच्या विरोधात उभी राहतात, यापेक्षा मोठा विरोधाभास नाही. लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे… लोकशाही म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर, संयम आणि सौहार्द.
आजचा प्रसंग याच गोष्टीची जाणीव करून देतो. मतभेद असू द्या, पण वैरभाव नको. विचार भिन्न असू द्या, पण मनं दूर होऊ नयेत.
दौंड तालुक्यातील हा प्रकार आपल्याला सांगून जात
समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांच्या मूल्यांवर लोकशाहीची इमारत उभी आहे.
एक फ्लेक्स तुटला तरी चालेल, पण माणसांमधील नातं तुटू नये.
एक प्रभाग, एक गाव, एकच समाज… निवडणूक संपते, पण आपुलकी कायम राहते.



