तालुक्यातील रस्ते विकास की भ्रष्टाचाराचे ‘सोनेरी खाण’?

आवाज लोकशाहीचा….
दौंड प्रतिनिधी
दौंड तालुक्यात सामाजिक विकासाच्या नावाखाली राबविल्या जाणाऱ्या बांधकाम आणि रस्त्यांच्या कामांमधून अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे आर्थिक श्रोत तयार झाले असल्याचे गंभीर आरोप सातत्याने होत आहेत. वर्षभरात अनेक रस्ते अक्षरशः उखडून पडले असताना, त्याच रस्त्यावर विविध योजनांच्या नावाखाली करोडो रुपये खर्च दाखविण्यात आले—ही बाब जनतेच्या रोषाचे मुख्य कारण ठरत आहे.
कामे पूर्ण झाल्याचे सांगणारे फलक दिशाभूल करणारे, माहिती अपूर्ण आणि गावांची नावे चुकीची लिहिल्याने नागरिक गोंधळून जात आहेत. कोणत्या गावासाठी कोणता रस्ता, किती अंतर, किती खर्च—याचा मेळ लागत नसल्याने हा प्रकार जाणूनबुजून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
अधिकारी माहिती देताना टाळाटाळ करत आहेत; उलट उगाचच अवांतर स्पष्टीकरण देऊन वेळकाढूपणा करणारी त्यांची भूमिका स्पष्ट दिसते. लोकांच्या नावाने मंजूर झालेल्या निधीचा खरा लाभ ठेकेदार–अधिकारी गटालाच मिळत असल्याचे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे.
दहा वर्षे राजकीय आशीर्वादावर रमलेला अधिकारी व ‘निकृष्ट’ कामांचा कारभार
तालुक्यात दशकभर एका अधिकाऱ्याने राजकीय आशीर्वादाच्या जोरावर तब्बल दहा वर्षे बस्तान बसवले. रस्त्यांवरील निकृष्ट कामांच्या तक्रारींचा कळस झाला असतानाच या अधिकाऱ्याने नुकतीच बदली करून घेतली. बदल्या घेतल्यानंतरही त्याने पुण्यात एका भ्रष्टाचारप्रसिद्ध ठिकाणी स्वतःची वर्णी लावून घेतल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.
गुणवत्ता नियंत्रणाच्या जबाबदारीवर असलेल्या व्यक्तीनेच तालुक्यात निकृष्ट दर्जाचे कामे करून ठेवली असताना, आता तो पुण्यात ठेकेदारांना कोणत्या ‘दर्जाचे’ दाखले देणार—हा प्रश्न नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करणारा आहे.
रस्त्यांवर माती, फुफाटा आणि भ्रष्टाचाराचे वादळ
डांबरी करणाच्या नावाखाली माती आणि फुफाटा भरून केलेल्या रस्त्यांची अवस्था पावसाळ्यानंतर भयावह झाली आहे. थंडीचे दिवस सुरू होताच डांबरी रस्त्यांतून उडणारा फुफाटा नागरिकांच्या डोळ्यात आणि फुफ्फुसात घुसत आहे.
हे सगळं होत असताना भ्रष्ट कारभारा मागील सूत्रधार कोण—हा प्रश्न तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा डोकेदुखीचा विषय ठरला आहे.
नागरिकांचा रोष इतका वाढला आहे की, “या अधिकाऱ्याचा सत्कार करायचा असेल तर डांबर उखडलेल्या आणि धुळीने भरलेल्या रस्त्यावरच करावा!” अशी संतप्त प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
सखोल चौकशी चीच मागणी
तालुक्यातील रस्त्यांवरील भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता, दिशाभूल करणारे फलक, निकृष्ट दर्जाची कामे—याचा सखोल तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
या बातमी साठी लक्षवेधी व्यंग चित्र बनवून द्या