आवाज लोकशाहीचा ,..विजय चव्हाण…
दौंड : ८८ वर्षांची नगरपालिका… पण शहर अजूनही मूलभूत सुविधांनंपासून वंचित?
दौंड – नगरपालिका स्थापनेला तब्बल ८८ वर्षे उलटून गेली असतानाही शहराच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. निवडणुकीचे वारे सुटताच ‘फिक्स नगरसेवक’, ‘उपरा-स्थानिक’, ‘वॉर्डनिहाय गणित’ अशा चर्चा रंगू लागल्या. परंतु शहराच्या विकासाचा मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिलेला आहे.
अष्टविनायक मार्गाची दैन्यावस्था, केंद्र सरकारच्या महामार्गातून दौंड शहरात प्रवेश करताना प्रवाशांना बसणारा फटका, रेल्वेस्थानकाचे संथ गतीने सुरू असलेले सुशोभीकरण… ही सर्व चित्रे शहराच्या विकासाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभी करतात. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड येथे थांबा मिळाला तरी जलद गाड्या येथे थांबत नाहीत, ही वस्तुस्थिती कायम आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून कोर्टासमोरचा रस्ता, भाजी मंडई परिसर, मुख्य बाजारपेठ अशा सर्वच भागांत खड्डे, साचलेले घाण पाणी आणि वाहतुकीची कोंडी हे नेहमीचे चित्र बनले आहे. छोटे व्यापारी रस्त्यावर व्यवसाय करतात, तर अंत्ययात्रेलाही तासन्तास गचके खात जावे लागते, अशा तक्रारी नागरिक व्यक्त करतात.
पाण्याबाबतची परिस्थिती ही तितकीच गंभीर असून आजही दौंड शहरातील अनेक नागरिकांना खेड्यातून पिण्याचे पाणी आणावे लागते. कचरा संकलन, ड्रेनेज लाईन, सेफ्टी टँक विल्हेवाट या सर्व व्यवस्थांमध्ये मोठी ढिसाळपणा असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत. ग्रामपंचायतीच्या जागेत रात्री उघड्यावरील सांडपाणी सोडले जाण्याच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर येते.
नवीन व जुने दौंड यातील विकासाचा तफावत स्पष्टपणे जाणवतो. शहरात पे-अँड-पार्किंगची सोय नाही. न प दौंड, पंचायत समिती परिसर, बाजारपेठ या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. मुलांसाठी मैदान, उद्यान, गार्डन यांच्या सुविधांचा पूर्ण अभाव आहे. अण्णाभाऊ साठे उद्यानाची अवस्था दयनीय असून अनेक वर्षांपासून विकासकामे रखडलेली आहेत.
दौंड–गार मार्गावरील पुलाचे काम पूर्ण होण्याआधीच कोसळले, उड्डाण पुलावर खड्ड्यांनी पुनश्च डोके वर काढले आहे. शहरात मॉल, मोठे शोरूम, आधुनिक व्यावसायिक सुविधा नाहीत. शेजारील बारामतीसारखे शहर वेगाने प्रगती करत असताना दौंड मात्र मागे पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन शहरातील सामाजिक कार्यकर्ते व चिंता व्यक्त करणाऱ्या नागरिकांकडून केले जात आहे. “विकासासाठी मिळालेल्या संधींचे सोनं करा. दिशाभूल करणाऱ्यांच्या मागे लागू नका,” असे मतही मोठ्या प्रमाणात व्यक्त केले जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा प्रश्न मात्र एकच –
८८ वर्षे झाली नगरपालिका स्थापन होऊन… पण विकास नेमका आहे कुठे?



