आवाज लोकशाहीचा —विजय चव्हाण
तालुक्यात रस्त्यावरील डांबर चोरण्याच्या घटना गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडत असून, यामध्ये तपास करणारेच अधिकारी सामील असल्याची चर्चा नागरिकांत जोर धरत आहे. डांबरचोरीमुळे कोट्यवधींच्या खर्चातून करण्यात आलेले अनेक रस्ते उघडे पडून धुळीने माखले आहेत. तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे डांबरीकरण झाले. कोट्यवधी रुपयांचा निधी लोकप्रतिनिधींनी आणल्याचा गवगवा फलकांद्वारे करण्यात आला. मात्र या रस्त्यांची गुणवत्ता अल्पावधीतच उघडकीस आली. काही ठिकाणी डांबर गायब झाल्याचे, तर काही मार्गांवर अंदाजपत्रकातील लांबी-रुंदी न पाळता कामे झाल्याचे नागरिक सांगतात.
रस्त्यावर फलक दिसतो — कोट्यवधींचा डांबरी रस्ता, पण प्रत्यक्ष मार्ग मात्र मातीचा झाल्याचे चित्र अनेक गावांत दिसून येते. “या रस्त्यावरचं डांबर गेले कुठे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीनुसार काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी आर्थिक तडजोड करून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत. रस्त्यांवरून फेरफटका मारल्यास दर्जाहीन कामे आणि उघडे पडलेले मार्ग स्पष्टपणे दिसतात. काही ठेकेदारांच्या मनाप्रमाणे रस्ते बनवले गेल्याने अंदाजपत्रकाची पायमल्ली झाल्याचे आरोप आहेत.
काँक्रीट रस्त्यांचीही अवस्था काही महिन्यांतच बिघडल्याने “सिमेंटही चोरीला गेलं का?” असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
तालुक्यात कामे मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी एकाच ठेकेदार गटाने वर्चस्व केल्याची चर्चा आहे. नागरिक आणि छोटे ठेकेदार यांच्या चर्चेत ‘गरुडा इन्फ्रा’ हे नाव वारंवार पुढे येत आहे. या कंपनीकडे कामे वळवण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे इतर ठेकेदारांकडे कामाचा तुटवडा निर्माण झाल्याचेही म्हटले जात आहे.
छोट्या ठेकेदारांच्या कुटुंबांवर याचा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की संबंधित विभागातील काही अधिकारी राजकीय आशीर्वादाने मदनमस्त झाले असून, तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी डांबर-सिमेंट चोरीसारखे प्रकार वाढीस लागत आहेत. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष रस्त्यांची अवस्था ठिकठिकाणी दयनीय आहे.
डांबरचोरी, निकृष्ट कामे आणि संगनमताचे आरोप… परंतु या सर्वांची चौकशी कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
नागरिकांमध्ये अशी टीका सुरू आहे की, लवकरच तालुका डांबर व सिमेंट चोरट्यांचा म्हणून ओळखला जाईल.



