……….,..आवाज लोकशाहीचा ……
…. ……….. विजय चव्हाण ………..
दौंड तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांच्या कारभाराने तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही विभागांचा कारभार म्हणजे “पक्का भ्रष्टाचार” असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
टक्केवारीच्या नशेत बुडालेले अधिकारी, प्रामाणिकतेचा अंत आणि टेंडरमाफियांचा खेळ — या सर्वामुळे दौंड तालुक्यातील तरुण ठेकेदारांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
प्रामाणिकपणाचा आटापिटा सोडून हे अधिकारी आता जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या खिशाचा विकास करण्यात गुंतले असल्याची तीव्र टीका होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या विभागात मंजूर झालेल्या कामांच्या निधीचा आणि प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेचा मेळ लागत नाही. कागदावर कोट्यवधींची कामे आणि जमिनीवर केवळ धुळीचा पसारा — ही स्थिती तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.याचा उत्तम दाखला वाखारी, गझला फॉर्म मार्ग खोर कडे जाणारा पाहिल्यास खात्री पटेल.
तक्रारींवर मौन, टीकेवर बहिरे — अधिकारी मात्र जणू भ्रष्टाचाराच्या छत्राखाली ‘आंधळे आणि बहिरे’ बनून बसले आहेत. गुणवत्तेच्या प्रश्नांवर तोंडांत बोळा कोंबून बसलेल्या या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच तालुक्यातील १८७ ठेकेदारांच्या भविष्याची माती झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
“गरुडा क्लब टेंडर” – भ्रष्टाचाराचं जाळं की विकासाचं नाव?
दौंड तालुक्यात “गरुडा इन्फ्रा” या नव्या नावाखाली टेंडर क्लब पद्धतीने देण्याचा खेळ सुरू झाल्यापासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून गरुडा कंपनीला टेंडर दिले आणि त्यातून मोठ्या आर्थिक फायद्याची “नामी युक्ती” आखली आहे.
या सर्व व्यवहारामागे पडद्याआड असलेल्या “अका”चा हात असल्याची चर्चा अधिक वेगाने पसरू लागली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने गरुडा इन्फ्रा उडत असताना, तालुक्याच्या तरुण ठेकेदारांच्या पंखांना मात्र कात्री लावली गेली आहे.
जनतेची मागणी — चौकशी होऊ द्या, सत्य समोर आणा!
या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, आणि टेंडर प्रक्रियेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता दौंड तालुक्यात जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील नागरिकांचा सूर स्पष्ट आहे —
“गावोगाव रस्त्यांवर भ्रष्टाचाराचे गटारे वाहत आहेत, आणि अधिकारी विकासाच्या नावाने स्वतःची संपत्ती वाढवत आहेत!”
आवाज लोकशाहीचा म्हणतो — दौंड तालुक्याच्या रस्त्यांवर धुळ उडते आहे, पण या धुळीत लोकशाहीचा चेहरा झाकला जाऊ देऊ नका! या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे — कारण ही फक्त टेंडरची गोष्ट नाही, हा संपूर्ण व्यवस्थेचा अध:पात आहे.




