बारामती एमआयडीसी उद्योजकांना पोलिसांचे दिलासादायक आश्वासन!



जबरदस्तीने पैसे मागितल्यास थेट खंडणीचे गुन्हे दाखल करणार – पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

बारामती प्रतिनिधी : आवाज लोकशाहीचा

बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता प्रशासनाच्या गंभीर दृष्टीक्षेपात आला आहे. अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात एमआयडीसी उद्योजकांची विशेष बैठक घेण्यात आली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत पोलिस आणि एमआयडीसी प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षाविषयक, वाहतूक आणि शिस्तीच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आहे.

या बैठकीस रिजनल ऑफिसर (एमआयडीसी) तथा उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तसेच बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन आणि सदस्य उपस्थित होते.

या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट इशारा दिला की, उद्योजकांकडून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांविरुद्ध थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल. कुठलीही तडजोड होणार नाही.”
अलीकडेच एमआयडीसी परिसरात उद्योजकांना धमकावणाऱ्या आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना नगर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय वाद निर्माण करणाऱ्या परप्रांतीयांवर कारवाई करण्यात आली असून, एका आरोपीच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच दोन हॉटेलमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणातील आरोपींनाही पोलिसांनी गजाआड करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर रिजनल ऑफिसर हनुमंत पाटील यांनी सांगितले की, “एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध करून दिली जाईल. सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. प्रशासन उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करेल, पण उद्योजकांनीही आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.” त्यांनी पुढे सांगितले की, परप्रांतीय मजुरांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ठेकेदार आणि रूममालकांनी ही जबाबदारी गांभीर्याने घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली.

या बैठकीतील प्रमुख मुद्दे असे की
• एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियोजन व पार्किंग समस्या
• सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज
• अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
• महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न
• खंडणी व गुंडगिरीविरोधात शून्य-सहनशीलता धोरण.

या वेळी हरिश्चंद्र खाडे (ग्रीन वर्ल्ड ॲग्रोटेक), मनोहर गावडे (बारामती ऑक्सिजन), शिवाजी निंबाळकर (स्वागत उद्योग), संदीप जगताप (जे.बी. इंडस्ट्रीज), अमोल धायगुडे (बारामती कॅटलिटेड), अतुल काळे (एशिया पॅक इंडस्ट्रीज), राकेश अवाक (किर्लोस्कर फेरस), अमित शर्मा (Senvion कंपनी), योगेश मगदूम (फेरेरो इंडिया प्रा. लि.), भरत जाधव (आरती एंटरप्राइजेस), अशोक कुमार राव (जय माता दी इंजिनिअरिंग), अविनाश सावंत (समर्थ इंटरप्रायजेस), अरविंद कन्स्ट्रक्शन, धनंजय जामदार, सूर्यवंशी आणि इतर अनेक उद्योजक उपस्थित होते.