कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट – नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका



कुरकुंभ (ता. दौंड) – औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट क्र. D-5, एमआयडीसी, कुरकुंभ) या केमिकल कंपनीत मंगळवार (दि. १२ ऑगस्ट) रोजी रात्री सव्वा आठ वाजता भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. प्लांट क्रमांक दोनमधील रिअॅक्टर  रिसिव्हरचा स्फोट इतका प्रचंड होता की, दोन किलोमीटर परिसरातील गावांमध्ये भीतीचे सावट पसरले.

या घटनेत पवन कुमार आणि महेंद्र राठोड (दोघे रा. कुरकुंभ) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या दुर्घटनेने परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

स्फोटाचा आवाज मुकादमवाडी, झगडेवाडी तसेच शेजारच्या उद्योग क्षेत्रात स्पष्ट ऐकू गेला. आगीचे लोळ दूरवरून दिसत होते

स्पोट झाल्यावर कुरकुंभ परिसरातील दृष

स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीचे पत्रे तुटून दूरवर उडाले, तर रिअॅक्टर रिसिव्हरचा पाईप फ्लॅंजसह पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून नागरी वस्तीत कोसळला.

नागरी वसाहती मध्ये स्पोट झाल्यावर पाईपचा उडालेला तुकडा

प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, रासायनिक प्रक्रियेदरम्यान रिअॅक्टर रिसिव्हरमध्ये झालेल्या स्फोटामुळे स्टायरीन ऑक्साईड केमिकल मोठ्या प्रमाणात सांडले. या रसायनाचा तीव्र दर्प आणि धूर नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरला असून, मळमळ, डोळ्यांची जळजळ आणि श्वसन त्रासाची अनेक तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत.

पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुकादमवाडी भागातील माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल जगताप यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोप केला की, हार्मोनी ऑरगॅनिक्स ही कंपनी वर्षभर उघड्यावर केमिकलयुक्त काळे पाणी सोडते. “स्थानिकांना रोजगार न देता बाहेरगावच्या कामगारांना कामावर ठेवले जाते. मात्र सततचे स्फोट, प्रदूषण आणि आरोग्यधोका यामुळे स्थानिकांचे जीवन नरकयातना झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तक्रारी असूनही निष्क्रिय आहे. अशा कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अन्यथा ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी परिस्थिती निर्माण होईल,” असे जगताप म्हणाले.

या दुर्घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेची हमी, प्रदूषण नियंत्रणाची कार्यवाही आणि नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

आग विझवण्यासाठी आलेली अग्निशामक दलाची कुमक

लागलेल्या आगीला अग्निशामक दलाच्या गाडीने विझवण्यात आले असले तरी भीतीने उरात लागलेली या परिसरातील रहिवाशांची आग कशी विझणार हा खरा प्रश्न आहे .