आवाज लोकशाहीचा विशेष प्रतिनिधी
. विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील शेतकरी सध्या पुणे शहरातून येणाऱ्या गटारगंगा आणि सडलेल्या कचऱ्याच्या कहराला मुकाट्याने सहन करत आहेत. शेतीसाठी ‘बेबी कॅनॉल’ मार्गे पाणी देण्याची योजना लोकप्रतिनिधींनी आणि शासनाने कोट्यवधींचा खर्च करून राबवली. मात्र, कोरेगाव पार्कजवळून नदीपात्रातील पाणी उचलताना शुद्धीकरणाची अट असतानाही, प्रत्यक्षात वीजपंपाद्वारे कोणतेही प्रक्रिया न करता गटारगंगेचे पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडले जात आहे.
या पाण्यातून येणारा उग्र वास पाटसपर्यंत (सुमारे ६५ किमी) पसरत असून, शेतकऱ्यांच्या पायावर जखमा होत आहेत. पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील धरण परिसरातील गावे विस्थापित झाली, पण आज त्याच शेतकऱ्यांना पुण्याच्या घरगुती आणि औद्योगिक गटारपाण्याचा सामना करावा लागत आहे.
त्याशिवाय, गेल्या काही वर्षांपासून पुण्याचा सडका कचरा मोठ्या वाहनांतून भांडगाव, भरतगाव, कासुर्डी, तामणवाडी, सहजपूर, नांदूर आणि पडवी परिसरात आणून टाकला जात आहे. “शेतकरी खतासाठी मागणी करतात” असा गैरसमज पसरवून हा कचरा खुलेआम टाकला जातो.
एकूणच, पुणे महापालिका दौंड तालुक्यावर आरोग्याला बाधक ठरणाऱ्या सर्व प्रक्रिया बिनधास्त राबवत आहे, आणि तालुक्यातील लोक हे सहन करत राहण्यामागचे खरे कारण शोधणे हीच खरी वेळेची गरज आहे.



