मानवतेला विसरून जातीय तेढाकडे झुकणार समाज कोण आहे ,यात बळी ठरणाराची जबादारी कोणाची,!



विशेष प्रतिनिधी | आवाज लोकशाहीचा | यवत (दौंड तालुका)

दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये नुकत्याच घडलेल्या जातीय वादाच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. समाजात अशा घटनांमुळे तात्काळ परिणाम घडतातच, पण दीर्घकालीन प्रभाव अधिक भयानक ठरतात – याचे भान आपण किती ठेवतो, हा खरा प्रश्न आहे.

जातीय आणि धार्मिक तणावातून निर्माण होणाऱ्या सामाजिक असंतुलनाचा सर्वात मोठा फटका बसतो तो सामान्य तरुणांना. क्षणिक भावनेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या आयुष्यातील दिशा बदलते, शिक्षण, नोकरी, कुटुंब आणि सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यांचे कुटुंब आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या होरपळून निघते.

आज महाराष्ट्राची भूमी संतांची, महापुरुषांची, क्रांतिकारकांची असूनही, त्यांच्या शिकवणीला हरताळ फासणारी काही डोकी समाजात विष पेरत आहेत. मानवतेचा मूलमंत्र, जो या भूमीचा आत्मा आहे, तोच पायदळी तुडवला जात आहे. संतांनी दिलेला “एकच धर्म – मानवता” हा संदेश आज पुन्हा पुन्हा आठवण्याची गरज निर्माण झाली आहे.


आजच्या तरुणांपुढे शिक्षण, विज्ञान, उद्योजकता, जागतिक संधी अशा अनेक दिशा खुले आहेत. मात्र काही समाजविघातक शक्ती त्यांच्या मनात द्वेषाचे बीज रोवून जात, धर्म, पंथ याच्या नावाने त्यांचे भवितव्य अंधारात टाकत आहेत. क्षुल्लक कारणावरून भावनिक भरात होणारे कृत्य आयुष्य उद्ध्वस्त करते, आणि नंतर उरतो तो पश्चात्ताप आणि सामाजिक बहिष्कार.

या घटनांचा खोल अभ्यास केला तर आढळून येते की, समाजात जात-धर्माच्या नावावर वाद पेटवणारे डोके स्वतः मात्र सुरक्षित अंतरावर राहतात, आणि बळी जातो तो गरीब, कष्टकरी, सामान्य तरुण.यांचा



छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य हे सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन उभं राहिलं. त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते, विचारांचे समर्थक विविध जातीतून होते. संत वाङ्मय, समाजसुधारकांचे योगदान, संविधान निर्मिती – याचे सार हेच होते की मानव हा केंद्रबिंदू असावा.

पण आज वाचनाची, अभ्यासाची, विवेकाची जागा अफवांनी, सोशल मीडियावरील भडक संदेशांनी आणि भांडवलशाही धर्मवादाने घेतली आहे. त्यामुळे सत्य हरवते आहे, आणि द्वेष वाढतो आहे.

धर्माचा, शिक्षणाचा कंट्रोल काही ठराविकांपुरता?

आज शिक्षण महागडे झाले आहे, धर्माचे प्रचारमंच राजकीय झाले आहेत. दोन्हीवरचा कंट्रोल काही ठराविक वर्गांकडे केंद्रित झाला आहे, असा आरोप अनेकांकडून होतो. अशा व्यवस्थेत सर्वसामान्य माणूस – त्याची माणुसकी, त्याची स्वप्नं – यांचा गळा घोटला जात आहे.

आजच्या परिस्थितीत अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे – माणुसकीचाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे. रक्त, श्वास, अन्न, पाणी या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाला सारख्याच लागू होतात. मग जाती, धर्म, पंथाच्या भिंती का?

साने गुरुजी म्हणतात, “खरा तो एकचि धर्म – जगाला प्रेम अर्पावे”
तुकोबाराय म्हणतात, “जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले – तोचि साधू ओळखावा”

ही शिकवण आजच्या तरुणांना कोणी देणार? त्यांना मानवतेचा विचार, विवेक आणि समतेचा मार्ग कोणी दाखवणार?

या प्रश्नांचं उत्तर मिळालं तरच समाजाचे पुनरुज्जीवन शक्य होईल. अन्यथा जातीय तेढाचा वणवा मानवतेला जाळून टाकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आवाज लोकशाही कोणत्याच्या व्यक्तीचे धर्माचे आणि समजण्याचे समर्थन करणार नाही मात्र अघटीं घटनांचा दुष्परिणाम भोगणारा फक्त माणूस असतो त्याला जात नसते मग तो कोणत्या धर्माचा असो .यवतं मधील प्रकरणात हिंदू मुस्लिम तिढा वाढला आणि दोन्ही बाजूला त्याचे पडसाद उमटले आहेत याचा विचार करून वाचकांसाठी झालेला हा शब्द प्रपंच आहे .याचा दुसरा तिसरा कोणताच अर्थ नाही !