आवाज लोकशाहीचा
यवत (प्रतिनिधी) –
२६ जुलै रोजी यवत गावातील नीलकंठेश्वर मंदिरात ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गावात गंभीर जातीय तणाव निर्माण झाला असून, याचे परिणाम म्हणून अनेक तरुण गाव सोडून गेले आहेत, गावात जमावबंदी आदेश लागू आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित पापा सय्यद या युवकाने मध्यरात्री गावठी दारूच्या नशेत विटंबना केली होती. सकाळी गावकऱ्यांना याची माहिती मिळताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरून या घटनेचा व्हायरल प्रसार होताच गावात संतापाची लाट उसळली होती याचा विपरीत परिणाम झाला आणि यवत गावकऱ्यान जमावबंदी आदेशाने गेली पाच दिवस जखडून ठेवले आहे .

२७ जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली. काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध सभा झाली. या सभेला काही मुस्लिम नागरिकांनीही पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर सोशल मीडियावरून आलेल्या प्रतिक्रिया, जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणांनी वातावरण तणावपूर्ण बनले.
पुणे व परिसरातील गावांमधून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते यवतला दाखल झाले होते , गावात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
३१ जुलै रोजी “यवत हिंदू सकल समाज”च्या बॅनरखाली सभा झाली होती, यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि तृतीयपंथी महागुरू हेमांगी यांनी सहभाग घेतला. यावेळी काही वक्तव्यांमुळे वातावरण पुन्हा एकदा चिघळले होती.
तत्पूर्वी पोलिसांनी आरोपी सय्यद याला अटक केली होती, मात्र सभेत पोलीस प्रशासना बाबतही अविश्वासाचे सूर उमटले होते,
१ ऑगस्ट रोजी एका मुस्लिम युवकाच्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा वातावरण पेटले होते. आठवडे बाजार सुरू असतानाच शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते काही मशिदी, वाहने आणि दुकाने लक्ष्य झाली होती.
एका मुस्लिम युवकाच्या बेकरीला आग लावण्यात आली होती काही घरांवर दगडफेक झाली होती पोलिसांनी जमाव हटवण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला होता. वातावरणाने चांगलाच पेट घेतलेला होता पोलिसाना याची मोठी झळ पोचली होतो शांतता करण्यासाठी बाहेरील पोलिसांची मदत घ्यावी लागली होती.
२ ऑगस्टपासून गावात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली. पोलिसांनी काही तरुणांना अटक केली असून, अनेक जण फरार झाले आहेत.
गावात दैनंदिन व्यवहार ठप्प असून, व्यापार, शिक्षण आणि समाजजीवन विस्कळीत झाले आहे. दोन्ही समाजांमध्ये भीती आणि असुरक्षितता वाढली आहे.आज दिनांक ५ ऑगस्ट ला सकाळी सहा ते ११वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करून ते वातावरणाचा अंदाज घेऊन ती उठवायची की कायम ठेवायची याचा विचार पोलिस करीत आहेत.कायदा सुव्यस्था सांभाळण्याची त्यांच्यावरील ही महत्वाची जबदारी असली तरी हिंदू मुस्लिम तिढ्याने पेटलेल्या गावकऱ्यांच्या मनातील उडालेला भडका सुद्धा शांत करण्याचे काम करण्याची जबाबदारी सांभाळण्याची असल्याने त्यांना काही निर्णय घ्यावे लागले आहेत
या घटनेतून एक विकृतीपूर्ण कृती, सोशल मीडियावरील भडक संदेश, बाहेरून आलेल्या संघटनांचा हस्तक्षेप आणि स्थानिक पातळीवर संयमाचा अभाव – या साऱ्यांनी मिळून एक स्फोटक परिस्थिति निर्माण केली.
यवत सारख्या सलोख्याच्या गावात दंगलसदृश स्थिती निर्माण होणे, ही केवळ भावनांवर नियंत्रण न ठेवणे आणि अविवेकी प्रतिसाद यांचे फलित असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे
या संपूर्ण प्रकारात मुस्लिम समाजाचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर मानसिक दडपण आले आहे. दुसरीकडे, हिंदू समाजातील तरुण पोलिस कारवाईच्या कक्षेत आले आहेत.
दोन्ही समाज या परिस्थितीत भरडले गेले असून, “या साऱ्याला जबाबदार कोण?” हा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे
हा सर्व प्रकार जातीय तेढ, सोशल मीडिया गैरवापर आणि बाह्य हस्तक्षेप यामुळे कसा भयानक वळण घेतो, याचे जिवंत उदाहरण आहे.
गावाने आता शांततेच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी मनामध्ये खोलवर गेलेली धास्ती, अविश्वास आणि फाटलेली सामाजिक नाळ सहज भरून निघणार नाही. हे तितकेच सत्य आहे




