दौंड तालुक्यात ‘थोरात युग’ अजून संपलेलं नाही!गटबाजी, नाराजी, पुनर्प्रवेश आणि आगामी निवडणुकांचे ‘तिढं’



आवाज लोकशाहीचा | दौंड प्रतिनिधी

दौंड तालुक्याचं राजकारण गेली तीन दशके ज्या नावाभोवती फिरत राहिलं आहे, ते नाव म्हणजे रमेश थोरात. सत्तेच्या अनेक बदलत्या वाऱ्यांमध्ये अनेकजण सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान झाले, परंतु त्यामागच्या पडद्यामागील ‘निर्णायक’ भूमिकेत थोरात कायम राहिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रभाव इतका खोलवर आहे की, दौंडमधील सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांसोबत नाही, तर थोरातांच्या ‘सावलीशी’ही सातत्याने लढावं लागत आहे.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत थोरात यांनी आपली दिशा बदलत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. तेव्हाच अजित पवार व शरद पवार या दोघांमध्ये उभ्या ठाकलेल्या फाट्याचा दौंडमध्ये थेट प्रभाव पडलेला दिसून आला. थोरात यांना विधानसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र अजित पवार गटात तिकीट न मिळाल्याने त्यांनी शरद पवार गटाची वाट धरली. हीच वेळ अनेकांनी आपली संधी मानत थोरातांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली. मतविभाजनाच्या खेळात थोरात पायउतार झाले आणि त्यांच्या विरोधकांनी थेट त्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला.


थोरात यांच्या आशीर्वादाने राजकारणात पुढे आलेले काही चेहरेच थोरातांच्या भूमिकेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. विशेषतः त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करताच काही दुखावलेले कार्यकर्ते अजित पवार गटात राहून त्यांच्याच विरोधात कार्यरत झाले. “ज्यांनी राजकारणात यश मिळवलं तेच आज थोरातांच्या विरोधात उभे राहतात,” असा एक जनसामान्य सूर तालुक्यात ऐकायला मिळतो.

रमेश थोरात यांनी १ ऑगस्ट रोजी वरवंड येथून औपचारिकरीत्या पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षबदल नव्हता तर तो त्यांच्या विरोधकांसाठी मोठा ‘झटका’ होता. अजित पवारांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर बसलेल्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी काही लपली नाही. थोरातांचे नेतृत्व सध्या त्यांना नकोसे असले तरी त्याच नेतृत्वाच्या आशीर्वादाने मिळालेलं स्थान विसरणे, हे राजकीय विस्मरण का आहे, असा सवाल उपस्थित होतो.

दौंडमधील सध्याचे भाजप आमदार राहुल कुल यांनी विजयी हॅट्रिक पूर्ण केली असली तरी थोरात यांनी त्यांच्या विरोधात एक लाख मताधिक्य घेतलं होतं ते आजही राज्याच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे थोरातांचा राजकीय दबाव अद्याप कायम असल्याचं मानलं जाते

दौंड नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ येत असताना गटबाजीचा विळखा अजित पवार गटाला महागात पडू शकतो. थोरातांविरुद्ध असणाऱ्या गटाच्या हट्टमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवणं दुरापास्त होऊ शकतं. “अजित पवार गट मजबूत करायचा असेल तर, गटबाजी अंत:करणपूर्वक संपवावी लागेल,” अशी स्पष्ट भावना सध्या जनतेतून व्यक्त होत आहे.


थोरात हे दौंडसाठी एक राजकीय वास्तव आहेत, ज्यांचं नेतृत्व मान्य नसलं तरी त्यांचा प्रभाव नाकारता येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये या ‘सावली’चा उपयोग होणार की अडथळा ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.