यवत : २६ जुलैच्या घटनेनंतर हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे मोठे नुकसान!कायद्याचा दणका?



आवाज लोकशाहीचा | दौंड तालुका प्रतिनिधी

२६ जुलैच्या रात्री यवत येथील निळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना एका मुस्लिम युवकाने केल्यानंतर संपूर्ण यवत गावच नव्हे, तर दौंड तालुक्यात सामाजिक सलोखा डळमळीत झाला आहे. या एका अंधारात घडलेल्या दृष्टकर्माचा परिणाम दोन्ही समाजांवर दिवसाच्या उजेडात उमटला — आणि हा परिणाम केवळ भावनिक नव्हे, तर कायदेशीर स्वरूपातही झळा सोसणारा ठरला आहे.

अमित  पापा सय्यद (वय ३५) या युवकाने मद्यधुंद अवस्थेत पुतळ्याची विटंबना केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी २७ जुलै रोजी बंदचे आवाहन करून निषेध नोंदवला. सोशल मीडियावर या घटनेच्या चर्चेने वणवा पेटवला आणि काही तासांतच यवतमध्ये इतर गावांमधून मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते जमले. “जय श्रीराम”, “जय भवानी”, “जय शिवाजी” अशा घोषणांनी गाव दणाणले. निषेध सभांमधील आक्रमक भाषणांनी वातावरण आणखी चिघळले.

या संतप्त प्रति क्रियेचे रूपांतर दुसऱ्या दिवशी थेट हिंसाचारात झाले. एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टने हिंदू समाजाच्या संयमाचा बांध फुटला. गावच्या मुख्य चौकात गर्दी झाली आणि काही तासांतच परिस्थिती बिघडली. संबंधित युवकाचे घर पेटवण्यात आले, मस्जिदवर हल्ला झाला, वाहने फोडली गेली,

इंदिरानगर मधील बेकरी पेटवण्यात आली, मुस्लिम घरांवर दगडफेक झाली, तसेच धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला.

ही झपाट्याने बिघडणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसां सोबतच दौंड, पुरंदर, शिक्रापूर, बारामती अशा परिसरातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधूरांचा वापर झाला, परंतु संध्याकाळपर्यंत वातावरण पूर्ण शांत होण्यास वेळ लागला.

मुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक श्री. फुलारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत प्रशासनाने कारवाई सुरू केली. जाळपोळ, हल्ला आणि दंगल खोरांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आतापर्यंत हिंदू समाजातील सुमारे ५० जणांवर गुन्हे दाखल झाले असून, हा आकडा १०० च्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, मूळ दृष्ट कृत्य करणाऱ्या मुस्लिम युवका सह गावठी दारू विक्रेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संपूर्ण प्रकरणात जे चित्र स्पष्ट होते, ते म्हणजे — “एकाच्या गुन्ह्याने दोघा समाजांची शांतता उद्ध्वस्त झाली”. संपूर्ण यवत गाव आणि तालुक्याने एक सामाजिक झटका अनुभवला आहे. अतिरेकी प्रतिक्रिया, अविचारी आंदोलन आणि धार्मिक द्वेषाच्या आहारी गेलेले अनेक तरुण आता कायद्याच्या विळख्यात सापडले आहेत.

या प्रकरणाचा सखोल विचार केल्यास, हे उमगते की — कायदा दोन्ही समाजां साठी समान असतो, आणि भावना व संतापाच्या भरात केलेल्या कृती शेवटी संपूर्ण गावासाठी, सर्व समाजासाठी क्लेशदायक ठरतात. या घटनेने पुढील काही महिने गावाचा सामाजिक समतोल बिघडण्याची भीती निर्माण केली आहे.

शेवटी, एकच गोष्ट स्पष्ट होते – जातीधर्माच्या नावाने उठलेला द्वेषाचा वणवा कोणालाच सोडवत नाही. तो अखेर सगळ्यांच्या उरात पेटतोच!

इंदिरानगर मधील बेकरी