यवत प्रतिनिधी
आवाज लोकशाहीचा
यवत येथील निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने यवत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला, तर सकाळपासून सायंकाळपर्यंत निषेधाच्या आणि आक्रोशाच्या स्वरात सभा, मोर्चे आणि घोषणाबाजी होत राहिली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सकाळी संतप्त सभा, सायंकाळी निषेध
गावातील काळभैरवनाथ मंदिरात सकाळी जमलेल्या ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सायंकाळी गावच्या मुख्य चौकात झालेल्या सभेत छत्रपतींच्या विटंबनेच्या प्रकाराचा निषेध करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. सभेत प्रशांत शिवणकर, उत्तमराव गायकवाड, श्रीपतराव दोरगे, अरविंद दोरगे, गोरक्षक अक्षय कांचन, रसिका वरुडकर यांच्यासह विविध वक्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
मुस्लिम समाजाकडे संशयाची सुई; वातावरण तापलं
संबंधित प्रकारात मुस्लिम समाजाच्या तरुणाचा सहभाग असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने त्या समाजाविरोधात नाराजी व्यक्त केली. यवतसह वरवंड गावातही असाच प्रकार घडल्याची चर्चा होती. सोशल मीडियावरून या प्रकरणाचे पडसाद उमटले आणि अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते परिसरात दाखल झाले.
भविष्याचा इशारा आणि भडक विधाने
सभेत बोलताना काही वक्त्यांनी पुण्याच्या ‘कोंढवा’ सय्यदनगर परिसराच्या उदाहरणाचा उल्लेख करत “यवतचाही कोंढवा होणार का?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा, शाळांमधील वागणूक, दुकानदारांवर बहिष्कार अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त झाल्या.
या वेळी काही गावकऱ्यांचीही भूमिका संशयाच्या छायेत आली. ‘गाव हिंदूंचं असताना छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना कशी झाली?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत वतनदारांच्या नावेही टोमणे मारले गेले.
पोलीस प्रशासन अलर्ट; अफजलखानाच्या उदाहरणातून संयमाचं आवाहन
सायंकाळी झालेल्या पदयात्रेनंतर जमावाने थेट यवत पोलीस स्टेशन गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी खुद्द हस्तक्षेप करत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ आणि ‘अफजलखान वध’ यासारख्या ऐतिहासिक उदाहरणांद्वारे त्यांनी संयम पाळण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षकांचा हस्तक्षेप; अटकेचे संकेत
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, “विटंबना करणारा तरुण व्यसनाधीन असून, तो पुतळ्याजवळ फोन विसरून गेला होता. त्याच्या ओळखीचा तपास सुरू आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. कोणत्याही गुन्हेगारी कृतीला माफ केले जाणार नाही.”
मुस्लिम समाजातील ‘जमात’ संशयाच्या भोवऱ्यात
या घटनेनंतर ‘जमात’ नावाने गावोगावी फिरणाऱ्या मुस्लिम तरुणांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुतळ्याची विटंबना करणारा तरुण यवत गावातच लहानाचा मोठा झालेला असून काही दिवसांपूर्वीच ‘जमात’साठी बाहेर गेला होता, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याअनुषंगाने धार्मिक शिक्षण देणाऱ्या जमातींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेने केवळ धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत, तर गावात शांततेचा प्रश्नही निर्माण केला आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहेच, पण समाजातही संयम, समज आणि संवादाचे मूल्य जपले गेले पाहिजे. इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा खरा अर्थ समाजाने आजच्या काळात कृतीतून दाखवणे आवश्यक आहे.




