घुंगराचा आवाज थांबवणारा गोळीबार: कला, राजकारण आणि पोलिस चौकशीत वाखारीचा तमाशा !



आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी, वाखरी (दौंड)

वाखरी येथील अंबिका लोकनाट्य कला केंद्रात २१ जुलैच्या रात्री घडलेली गोळीबाराची घटना राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. लोककला सादर होत असताना, रसिकांच्या बैठकीत अचानक गोळी झाडली गेली आणि घुंगरूचा आवाज थांबला. या घटनेने तमाशा केंद्र, पोलिस प्रशासन, राजकीय मंडळी आणि प्रसारमाध्यमे या सर्वांना हादरवले आहे.

या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी मुळशी-भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू कैलास ऊर्फ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, रघुनाथ आव्हाड यांना अटक करून दौंड न्यायालयात हजर केले असून २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौथ्या आरोपी चंद्रकांत मारणे याने उशिरा हजेरी लावली.

गोळीबारानंतर एका महिला कलावंताला चक्कर आली, मात्र तिच्यावर झालेल्या परिणामांचा स्पष्ट उल्लेख एफआयआरमध्ये नसल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे. याप्रकरणातील मॅनेजर व मालकाने दोन दिवस उशिरा पोलिसात तक्रार दिली, ज्यामुळे पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

प्रश्न उपस्थित होतो की, कलावंतांच्या नावाखाली सादर होणाऱ्या कलाकृती चार भिंतीआड कोणत्या प्रकारे सादर केल्या जातात? आणि अशा “कलेचे” रसिक कोण असतात? वाखरी येथील अंबिका केंद्र हे पूर्वी चौफुला म्हणून राज्यात गाजलेल्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेवर संशयाची छाया निर्माण झाली असून, सीसीटीव्ही फुटेज उशिरा का ताब्यात घेतले गेले, यावरून पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर बोट ठेवले जात आहे.

राजकीय वर्तुळातही ही घटना खळबळजनक ठरली असून, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा भाऊ अशा प्रकारच्या प्रकरणात अडकल्यामुळे विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. कलावंताला गोळी लागल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर सुरू आहे, मात्र त्याची अधिकृत नोंद नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असली तरी अशा स्वरूपात चालणाऱ्या बैठकी व कला केंद्रांनी “कलेच्या” आड काही वेगळेच चालवले जात नाही ना, यावर आता समाजातूनच प्रश्न उपस्थित होतो आहे.



पुढे काय?
या घटनेची सखोल चौकशी होणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात कलावंतांच्या नावावर “रक्तरंजित तमाशा” होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्वीचा तमाशा गावगड्याच्या जत्रा यात्रेत उघड्यावर केला जायचा आणि रसिक मोकळ्या मैदानात ठाण मांडून बसून त्याची कदर करायचा तो नंतर तिकीटवरही पाहण्याचा योग आला तंबूच्या आत मध्ये हजारोंच्या संख्येने या कलेची कदर व्हायची ती कला आता चार भिंतीच्या आत मध्ये आलेली आहे  (सर्वच नाही )बाहेरून तिला कंपाउंड झालेला आहे या कलाकारांच्या हितासाठी बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि यातूनही आलेले रसिक या चार भिंतीच्या आत मध्ये या कलेच्या लोभापाई कोणत्या स्तराला जातात काय करतात हे समजत नाही , एखादी घटना घडली तरच बाहेरील जगातील लोकांना समजत की बाब या कलाकारांच्या दृष्टीने सुद्धा घातक असून ज्या गावांमधून असे लोकनाट्य कला केंद्र आहेत त्या गावकऱ्यांची बदनामी सुद्धा होण्याचे कारण बनते यासाठी प्रशासनाने या कलेचा सादरीकरण करणाऱ्यांची तसेच येथे येणाऱ्या रसिकांची सर्व माहिती पोलीस प्रशासन यांच्याकडे असली पाहिजे ती काळाची गरज आहे येणाऱ्या रसिकांचे ओळखपत्राची नोंद  कला केंद्रावरती नोंदणी ठेवावे लागेल का याचा विचार झाला पाहिजे म्हणजे घटित प्रकार टळतील या मुळे का होईना कलेला दाद देणारी साद देणारी रसिकांची या ठिकाणी गर्दी होईल दर्दी रसिक येतेली पण बेदर्दी येणार नाहीत !