केडगाव पोलीस चौकीवर राजकीय लुडबुड? तक्रारदारांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर; चौकी स्थलांतराची मागणी जोर धरते

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण

दौंड तालुक्यातील केडगाव पोलीस चौकीच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस चौकीची सध्याची जागा बदलण्यात यावी, जेणेकरून पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य तक्रारदार यांना निर्भय वातावरणात काम करता येईल, अशी मागणी आता नागरिक, काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्रांकडून दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव पोलीस चौकी ही बाजार मैदानाच्या एका कोपऱ्यावर असून चौकीलगत काही राजकीय पदाधिकारी, गावपुढारी आणि कार्यकर्त्यांची कायमस्वरूपी बैठक भरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चौकीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जाते. कोण तक्रार देण्यासाठी आला आहे, कोणाविरोधात तक्रार आहे, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जात असल्याची चर्चा आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे काही जण पोलीस चौकीतच किंवा अगदी शेजारी दीर्घकाळ बसून राहतात. त्यामुळे तक्रारदारांना मोकळेपणाने आपली बाजू मांडणे कठीण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या गोपनीयतेचा आणि विश्वासाचा हा प्रश्न असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
स्थानिकांकडून असा आरोपही केला जात आहे की, काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप करून पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. तक्रार कोणत्या गटाशी संबंधित आहे, त्यानुसार वातावरण तयार करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा असून, अशा हस्तक्षेपामुळे निष्पक्ष तपास प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर, बाह्य हस्तक्षेपामुळे कामकाजावर ताण येत असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सध्या दौंड तालुक्यातील गट-तटाच्या राजकारणाचा परिणाम विविध शासकीय कार्यालयांवर होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तक्रारदारांना सुरक्षित, गोपनीय आणि निर्भय वातावरण मिळणे अत्यावश्यक आहे.
यामुळे केडगाव पोलीस चौकीचे स्थलांतर अशा ठिकाणी करण्यात यावे, जिथे राजकीय अड्डे, अनावश्यक गर्दी किंवा बाह्य हस्तक्षेपाला वाव राहणार नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलीस ठाणे किंवा चौकी ही न्याय मिळविण्याची पहिली पायरी असते. तेथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गोपनीयता, सुरक्षितता आणि निष्पक्षपणे तक्रार नोंदविण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीतील परिस्थितीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि आवश्यक असल्यास चौकीच्या स्थलांतराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.