आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
बोरमलनाथ देवस्थान प्रकरण : महसूल अधिकाऱ्यांच्या पत्राने उभे केले गंभीर प्रश्न; सत्य काय, याचे उत्तर आता पुजारी परिवारानेच द्यावे!
पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बोरमलनाथ देवस्थानावर निर्माण झालेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विभागीय महसूल अधिकाऱ्यांनी दौंड तहसीलदारांना दिलेल्या लेखी पत्रामुळे देवस्थानाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यावश्यक झाले आहे.
व्यवस्थापनासंदर्भात नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप होत आहेत. देवस्थानाच्या मालमत्तेचा वापर कोणाच्या फायद्यासाठी झाला? शासनाकडे सादर केलेली माहिती वस्तुस्थितीशी सुसंगत होती का? देवस्थानाच्या उत्पन्नाचा उपयोग धार्मिक कार्यासाठी झाला की इतर कारणांसाठी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
स्थानिकांच्या माहितीनुसार देवस्थानाकडे सुमारे ४० एकर जमीन आहे. त्या जमिनीच्या उत्पन्नातून पूजा-अर्चा, दिवाबत्ती आणि देवस्थानाचा कारभार चालणे अपेक्षित असताना, त्या मालमत्तेच्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका भाविकांच्या मनातील विश्वासाला धक्का देणाऱ्या ठरत आहेत.
देवस्थानाशी संबंधित गो शाळेच्या कामकाजा बाबतही विविध आरोप समोर येत असून, त्याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पुजारी परिवारातील मालमत्ताविषयक वाद न्यायालय आणि शासकीय कार्यालयांत प्रलंबित असल्याचेही समोर येत आहे.
श्रद्धा ही कोणाचीही खासगी मालमत्ता नसते. देवस्थान हे संपूर्ण समाजाचे असते. त्यामुळे देवस्थानाच्या नावावर कोणताही संशय निर्माण होणार नाही, याची जबाबदारी सर्वप्रथम व्यवस्थापन आणि पुजारी परिवाराची आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, प्रशासनाकडून पत्र निघते, आरोप समोर येतात, पण त्यावर अधिकृत आणि पुराव्यानिशी स्पष्टीकरण समोर येत नाही. हे मौन जितके वाढेल, तितक्या शंका वाढत जातील. म्हणूनच संबंधितांनी सर्व कागदपत्रे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.
प्रशासनानेही या प्रकरणात कोणताही मुलाहिजा न ठेवता चौकशी करावी. जर आरोप खोटे असतील तर संबंधितांना निर्दोष घोषित करावे; आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास महाराष्ट्रातील लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी. देवाच्या नावावर चालणाऱ्या कोणत्याही संस्थेला कायद्यापेक्षा मोठे समजले जाऊ शकत नाही.
श्रद्धेचा पाया हा सत्य, पारदर्शकता आणि प्रामाणिक पणावर उभा असतो. त्यामुळे या प्रकरणातही सत्य बाहेर येणे हेच बोरमलनाथ देवस्थान, भाविक आणि समाजाच्या हिताचे आहे.



