आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण
विशेषवृत्त……………
दौंड तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बोरमल नाथ देवस्थाना.बाबत सध्या विविध आरोप, प्रत्यारोप आणि चर्चांना उधाण आले असून, या घडामोडींमुळे देवस्थानाच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना अनेक भाविक व्यक्त करत आहेत.याला पुजारी कारणीभूत आहेत ?
श्री क्षेत्र बोरमलाथ हे दौंड, हवेली, बारामतीसह राज्यभरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, ए. आर. अंतुले तसेच अनेक मान्यवरांनी या देवस्थानास भेट दिली होती. दौंड तालुक्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक उपक्रमांची सुरुवातही या देवस्थानात नारळ फोडून करण्याची परंपरा आहे.
मात्र, अलीकडच्या काळात देवस्थानाशी संबंधित जमीन, ट्रस्टचे कामकाज, गोशाळा, देवस्थान परिसराचा व्यावसायिक वापर, लग्न समारंभांचे आयोजन तसेच इतर आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांबाबत विविध आरोप सार्वजनिक चर्चेत आले आहेत. काही नागरिकांकडून देवस्थानाच्या नावाचा वैयक्तिक हितासाठी वापर होत असल्याचाही आरोप केला जात असून याची जबाबदारी पुजारी यांच्यावर ते ठेवताना दिसत आहे .
याशिवाय, वन विभागाच्या जमिनीशी संबंधित बांधकामाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असून, या सर्व बाबींची संबंधित शासकीय यंत्रणांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
देवस्थान ट्रस्टच्या कारभाराबाबतही अनेक वादग्रस्त मुद्दे विविध शासकीय कार्यालये आणि न्यायालयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणातील सत्य काय आहे, हे निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवस्थानाची प्रतिमा मलिन होईल, अशी कोणतीही कृती झाली असल्यास त्याची कायद्यानुसार चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, जर सर्व आरोप निराधार असतील, तर तेही अधिकृत चौकशीतून स्पष्ट झाले पाहिजे. त्यामुळे अफवा, आरोप-प्रत्यारोप आणि संभ्रम यांना पूर्णविराम मिळू शकतो.
या प्रकरणात कोणालाही न्यायालयीन किंवा सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयापूर्वी दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. मात्र, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, संबंधित महसूल, वन व इतर लागू कायद्यांनुसार सर्व व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे.
आता भाविक आणि नागरिकांचा एकच प्रश्न आहे—श्री क्षेत्र बोरमलनाथ देवस्थाना बाबत सुरू असलेल्या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर कधी येणार? आणि पुजारी यांच्या कारभाराचा खरा की खोटा विषय उघडा होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .



