आवाज लोकशाहीचा – विशेष वृत्त प्रतिनिधी विजय चव्हाण
गणेशोत्सवाचे दिवस सुरू होताच हिंदू बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावागावात, शहरोशहर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली असून विसर्जनापर्यंत भक्ती, श्रद्धा आणि धावपळ यांचा संगम दिसून येत आहे.
‘विघ्नहर्ता’, ‘लंबोदर’, ‘विनायक’ अशा गणपतीच्या अनेक नावांसह अष्टविनायक परंपरेचीही भक्तांमध्ये ओढ कायम आहे. मात्र या उत्सवाच्या मागे असलेला इतिहास, सामाजिक पैलू आणि आर्थिक समीकरणे याकडे फारसे लक्ष जात नाही.
गणेशोत्सव सध्या तीन गटांभोवती फिरताना दिसतो मूर्तीकार – मूर्ती घडवून विक्रीतून थेट आर्थिक लाभ घेतात. भक्त – मूर्ती विकत घेऊन दहा दिवस भक्तिभावाने सेवा करतात. वेळ आणि पैसा खर्च होऊन त्यांना आर्थिक तोटा पत्करावा लागतो.
सेवा पुरवठादार – मंडप साहित्य, सजावट, कार्यक्रम, ध्वनीव्यवस्था अशा सेवांतून कोणतेही थेट कष्ट न करता मोठा नफा मिळवतात.
या तीन स्तरांमधूनच उत्सवाचे आर्थिक चक्र फिरते आणि समाजात विविध हितसंबंध निर्माण होतात. धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली काहींना थेट नफा, काहींना तोटा तर काहींना फक्त अनुभव मिळतो.
सामाजिक एकात्मता, कलाविष्कार आणि भक्तीचा रंग यामुळे गणेशोत्सव हा प्रेक्षणीय ठरतो. परंतु यातील आर्थिक व सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणं आजच्या काळात महत्त्वाचं असल्याचं जाणकारांचे मत आहे.



