जीपीएस प्रणाली व माजी सरपंच उज्वला परदेशी(कुंभारगाव) यांच्या तत्परतेने या मच्छीमारांच्या होड्या व इंजिन चोरीचा पोलिसांनी लावला छडा |

उजनी जलाशयातील मच्छिमारांच्या होड्या व त्यांची इंजिन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या | ८ लाख ३० हजार २०० रुपयांचा ऐवज आरोपीकडून जप्त |

उजनी धरणातील होड्या व त्यांची इंजिन चोरीचे मोठे रॅकेट ? पोलीस उघड करतील का?

भिगवण: आवाज लोकशाहीचा

उजनी जलाशयातील मच्छिमारांच्या होड्या व होडीच्या इंजिन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकताच त्यांच्याकडून इंजिन चोरीचे घबाडच सापडले आहे.या चोरट्यांकडून चार होडी इंजिन एक लोखंडी होडी असा एकूण साडे आठ लाखांचा ऐवज हस्तगत करून आरोपींना गजाआड केले आहे.असून विशेषतः जीपीएस प्रणाली व माजी सरपंच उज्वला परदेशी(कुंभारगाव) यांच्या तत्परतेने या इंजिन चोरीचा छडा लावला असल्याने अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी भिगवण पोलीस स्टेशनला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे..

दत्तू हिरामण घटे (वय-३८ वर्षे) व रमेश हिरामण गव्हाणे(वय -३७ वर्षे ) दोघे राहणार-वरखडे,ता.नेवासा जि.अहिल्यानगर)अशी मुद्देमालासह अटक केलेल्यां आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की,रविवार दि २६ ते सोमवार दि २७ रोजीच्या दरम्यान धुमाळवाडी येथील अनिल नामदेव धुमाळ यांची मासेमारी बोटीला वापरण्यात येणारे होंडा कंपनीचे १६० एच,पीचे इंजिन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.याबाबतची फिर्याद भिगवण पोलिसात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान होडीची इंजिन चोरल्याची माहिती माजी सरपंच उज्वला परदेशी यांना कळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला घटनेचे गांभीर्य पाहून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पोलिस पथक तयार करून तसेच जीपीएस प्रणाली व गोपनीय माहितीचा आधार घेत चोरट्यांचा पाठलाग केला आणि मुद्देमालासह चोरट्यांना गजाआड केले असताना या चोरट्यांकडुन अनिल धुमाळ यांच्याकडून इंजिनसह इतर मच्छिमारांच्या चोरीस गेलेली एक लोखंडी होडी,चार बोट इंजिन असा एकूण ८ लाख ३० हजार २०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.यावेळी संबधित संशयित चोरट्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

ही कामगिरी ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे,पोलिस उपनिरीक्षक प्रविण जर्दे तसेच विठ्ठल वारगड,पांडुरंग गोरवे,सुभाष गायकवाड,प्रसाद पवार,सचिन पवार,रणजित मुळीक या पथकाने केली.

विशेष वाचा ::-::
| चोरीचे मोठे रॅकेट ?

उजनी धरणातील मच्छिमारांच्या होड्या व त्याची इंजिन चोरीचा मोठा धुमाकूळ अज्ञात चोरट्यांनी घातला असल्याने मच्छिमार अस्वस्थ झाले होते.आत्तापर्यंत अंदाजे शंभरहून इंजिन म्हणजे ५० लाखांहून अधिक इंजिन व होड्यांची चोरी झाल्याची चर्चा मच्छिमार वर्गात आहे.

साहजिकच चोरीची व्याप्ती लक्ष्यात घेता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामध्ये स्थानिक गुन्हेगार आहेत का याची चौकशी होणे गरजेचे आहे.या इंजिन चोरीचा व त्यामागच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी उज्वला परदेशी व उपस्थित मच्छिमारांनी केली.

त्यावर या गुन्ह्याच्या मुळाशी पोलीस जातील असा विश्वास गणेश बिराजदार यांनी दिला.