संशयातून जेष्ठाचा खून करून परराज्यात फरार आरोपीला दौंड पोलिसांकडून अटक,वरिष्ठाकडून दौंड पोलिसांचे कौतुक |

दौंड: आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी : विठ्ठल होले

दोन वर्षांपूर्वी कोळसा काढण्याचे काम करणाऱ्या एका साठ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला धारदार शस्त्राने वार करून खून करून मृतदेह उसाच्या फडात पाचटा खाली झाकून फरार झालेल्या आरोपीला दौंड पोलीसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली आहे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे..

या घटनेचा वृत्तान्त असा की पेडगाव तालुका दौंड गावचे हद्दीत रामभाऊ गोधडे यांच्या शेतात दिलीप सांगळे हे कोळसा काढण्याचे काम करत होते.त्यांच्याकडे कामगार म्हणून हरिश्चंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे (वय-४८ राहणार कारले गंगेचीवाडी) तालुका पेण जिल्हा रायगड,लिला उर्फ रुपाली गणेश वाघमारे राहणार भूनेश्र्वर ता रोहा जि रायगड,चंदर गणपत जाधव (वय-६० राहणार वांद्रे) तालुका मुळशी पुणे हे एकत्रित काम करत होते.आरोपी हरिभाऊ यास शंका होती की,लिला हिच्याकडे चंदर हा वाईट नजरेने पहात आहे.त्या रागातून हरिभाऊ आणि लिला या दोघांनी मिळून कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून खून करून मृतदेह उसाच्या फडात पाचटा खाली झाकून फरार झाले होते.

त्यांच्या विरुद्ध दिलीप सांगळे यांनी ६/३/२३ रोजी गुन्हा दाखल केला होता.त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२३ भा.द.वि.कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या आरोपींच्या शोधात असताना पोलिसांना माहिती मिळाली की सदर आरोपी कर्नाटक राज्यात कोळसा काढण्याचे काम करत आहे.पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांनी एक पथक तयार करून कर्नाटक
राज्यातून सदर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार,पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके,पो हवा किरण पांढरे,विनोद चव्हाण,किरण ढूके,पो कॉन्स्टेबल संजय कोठावळे यांनी केली आहे.

उपविभागीय पोलीस अधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार पुढील तपास करीत आहेत.