महाराष्ट्राचा ५८ व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम
आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विठ्ठल होले
महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये २४,२५ व २६ जानेवारी दरम्यान पुणे येथील मिलीटरी डेअरी फार्म ग्राउंड, पिंपरी पॉवर हाउस जवळ, येथील विशाल मैदानांवर आयोजित केला जात असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
परमात्म्याची ओळख करुन मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करुन विश्वामध्ये सौहार्द व शांतीसुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.
या आध्यात्मिक समगमाच्या आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज आदरणीय श्री.मोहन छाब्राजी यांच्या शुभहस्ते बुधवारी दि.२५ रोजी करण्यात आला.
या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज श्री.जोगिंदर मनचंदा, प्रचार प्रसार कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) डॉ.दर्शन सिंह, समागम समितीचे चेअरमन श्री.शम्भुनाथ तिवारी, समन्वयक श्री.ताराचंद करमचंदानी आणि समागम समितिच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते.याप्रसंगी बारामतीसह सातारा झोन मधून मोठ्या संख्येने भाविकांनी या समारोहामध्ये भाग घेतला.
स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय श्री.मोहन छाब्राजी म्हणाले, की सतगुरुंच्या असीम कृपेने आयोजित होत असलेल्या या संत समागमामध्ये तोच सत्याचा संदेश दिला जाईल जो युगानुयुगे संत-महापुरुषांनी समस्त मानवतेला दिला.
ते पुढे म्हणाले,की संत निरंकारी मिशन मानवता व विश्वबंधुत्वाचे मिशन आहे.परमात्म्याचे ज्ञान प्राप्त केल्याने मानवा-मानवातील अंतर संपून जाते आणि एकमेकांशी प्रेमाचे नाते जोडले जाते. ज्यायोगे वैर, द्वेष, ईर्षा यांसारख्या दुर्भावना दूर होतात. ब्रह्मानुभूतिने आत्मानुभूति प्राप्त करुन मानवी गुणांनी युक्त होऊन धरतीसाठी वरदान बनेल असे जीवन जगणे हे मनुष्य जीवनाचे मुख्य लक्ष्य आहे.
हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत.



