पुणे–सोलापूर महामार्गावर ‘खाकी’ आणि ‘लेखणी’च्या आडून अनैतिकतेचा बाजार?

आवाज लोकशाहीचा..
पुणे/दौंड: पुणे–सोलापूर महामार्गावर सध्या हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायाने रौद्र रूप धारण केले आहे. मात्र, या बेकायदेशीर उद्योगापेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या काळ्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि काही ‘कथित’ पत्रकारांमध्ये सुरू असलेली ‘हप्तेखोरी’ची चर्चा. लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि कायद्याचे रक्षकच जर या दलदलीत भागीदार असतील, तर दाद मागायची कोणाकडे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
हप्तेखोरीचे ‘महामार्ग’ जाळे
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील खडकी, कुरकुंभ, देवळगाव गाडा, खोपडी, वाखारी, वाकडापूल, बोरीभडक आणि चौफुला या परिसरातील काही हॉटेल्समध्ये हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
लाखोंची वसुली: दौंड तालुक्यात या वसुलीचे आकडे लाखोंच्या घरात असून, शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातही याचे लोण पसरले आहे.
चौथ्या स्तंभाला काळीमा: यवत, भिगवण, दौंड आणि हवेली परिसरातील काही पत्रकारांची नावे या वसुली प्रकरणात चर्चेत आहेत. मुठभर लोकांच्या हव्यासापोटी संपूर्ण पत्रकारितेची प्रतिमा डागाळली जात असल्याची खंत प्रामाणिक पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.
पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात?
प्रशासनाकडून वेळोवेळी कारवायांचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, या कारवाया केवळ ‘दिखाऊ’ आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठराविक हॉटेल्सवर धाडी टाकायच्या आणि जिथे अर्थपूर्ण व्यवहार झाले आहेत, तिथे कानाडोळा करायचा, अशी ‘निवडक कारवाई’ची पद्धत संशयास्पद ठरत आहे. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर ही साखळी चालणे अशक्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी पुनीत झालेल्या या महाराष्ट्रात आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतलेल्या यंत्रणेच्या नाकाखाली जर माता-भगिनींची अब्रू लिलावात निघत असेल, तर हे सामाजिक अध:पतन आहे.”
प्रशासनाला आमचे सवाल:
महामार्गावरील बीट मार्शल आणि स्थानिक गुन्हे शाखेला या हालचालींची माहिती नाही का?
जर माहिती आहे, तर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई का होत नाही?


….आता वेळ कृतीची!….
लोकशाहीची मूल्ये टिकवण्यासाठी आणि समाजातील अनैतिकतेचा हा कर्करोग समूळ नष्ट करण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे काळाची गरज आहे. केवळ लहान मासे पकडून चालणार नाही, तर या महासागरातील ‘मगरी’ शोधून काढणे आवश्यक आहे. जर गृहखात्याने याकडे दुर्लक्ष केले, तर सामान्य जनतेचा व्यवस्थेवरील उरलासुरला विश्वासही उडून जाईल.
– आवाज लोकशाहीचा… सत्य आणि न्यायासाठी!